पुनरुत्थान समरसता गुरुकुलम आश्रम हे मागील काही वर्षांपासून वंचितांना शिक्षण देत आहेत. याच आश्रमातील १७ पैकी १३ विद्यार्थी चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची यशोगाथा तशी रंजक आणि प्रेरणा देणारी आहे. कसा होता या विद्यार्थ्यांचा संघर्ष जाणून घेऊयात…

अमोल सोमनाथ भालेराव,सचिन राठोड,नौशाद नजीर हुसेन यांच्यासह दहा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. अमोल भालेराव याला दहावीच्या परीक्षेत ६७.६० टक्के गुण मिळाले आहेत. अमोल हा लहान असतानाच त्याच्या आई वडीलाचे निधन झाले, परिस्थिती अगदीच बेताची. अमोलच्या मोठया भावाने परिस्थितीशी दोन हात करत अमोलला शिकवण्याचे ठरवले आणि अमोलला पिंपरी चिंचवड मधील आश्रमात इयत्ता ४ थी मध्ये प्रवेश देण्यात आला. अमोलही दिवस रात्र अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे, त्याला पुढे चालून अभियंता बनायचे आहे. सद्यस्थितीला अमोलचा मोठा भाऊ रिक्षाचालक म्हणून काम करत कुटुंबाचा गाडा चालवत आहे.

सचिन राठोडची कथाही अशीच काहीशी. अतिशय हालाकीची परिस्थितीतून वाटचाल करत तो दहावीत उत्तीर्ण झाला आहे. सचिनला वडील नाहीत, आई मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवते. त्याने ६३.८० टक्के गुण मिळवत दहावीच्या परीक्षेत यश मिळवले आहे.

तर नौशाद नजीर हुसेन हा अत्यंत गरीब आहे. त्याचे आई वडील हे मुंबई येथील ग्रँटरोडवरील फुटपाथ वर राहतात. नौशादने दहावी उत्तीर्ण करत ६३.२० टक्के गुण मिळवले आहेत. आई वडिलांचा गळ्यातले आणि कानातले विकण्याचा फिरता व्यवसाय आहे. नौशादला भेटण्यासाठी येतानाही त्याचे आईवडील हे रेल्वे मध्ये त्यांचे साहित्य विकत येतात. त्यामुळे एकिकडे घरची परिस्थिती अशी असताना या मुलांनी मिळवलेले यश खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगेच आहे. विशेष म्हणजे कुठलेच आर्थिक बळ आणि कुटुंबाचा फारसा पाठिंबा नसताना या मुलांनी केलेली कामगिरी उल्लेखनीयच आहे. त्यामुळे यांच्या या कामगिरीला सलाम…