Drone firework accident: चीनच्या हुनान प्रांतातील लियूयांग शहरात ‘ऑक्टोबर-द साउंड ऑफ ब्लूमिंग फ्लॉवर्स’ असा एक भव्य ड्रोन आणि फायरवर्क शो आयोजित करण्यात आला होता. या शोसाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. उत्सुकता आणि भव्यदिव्य असा हा शो पाहण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये पाहता पाहता भीतीचं वातावरण निर्माण झालं. हा शो जमीन आणि पाण्यावर थ्री डी व्हिज्युअल स्पेक्टेकल स्वरूपात डिझाइन करण्यात आला होता. मात्र, अचानक फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये काही तरी बिघाड झाल्याने मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे जळते तुकडे, मोठमोठ्या ठिणग्या खाली पडू लागल्या. हे घडताच जीव वाचवण्यासाठी लोकांची एकच धावपळ सुरू झाली.

शोदरम्यान नेमकं काय घडलं?

चीनमधील या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शो पाहायला आलेले लोक भीतीने पळताना दिसत आहेत. काही लोकांनी आगीपासून वाचण्यासाठी डोक्यावर खुर्च्या घेऊन पळत आहेत. कारण आकाशातून आगीच्या ठिणग्या कोसळत होत्या. या शोसाठीची उत्सुकता काही क्षणांतच भीतीच्या वातावरणात बदलली. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी लगचेच काही अंतरावर घेरा बनवला. जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात येऊ शकेल. लियूयांग संस्कृती आणि पर्यंटन ब्युरोने सांगितले की, कोरड्या वातावरणामुळे आतषबाजी हवेत पसरली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या ठिकाणी लगेचच अग्निशमन दल तैनात झाले, जेणेकरून कुठेही आग पसरू नये.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

इंटरनेटवर हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी याला मानविनिर्मित संकट म्हटले आहे. एका युजरने लिहिले की, “हे सुंदर असायला हवं होतं, पण जणू काही जगाचा अंत होत आहे असं वाटलं”. दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, “अशी आतषबाजी लोकांच्या डोक्यावर करणं मूर्खपणा आहे, हे फक्त पाण्याच्या वर करायला हवं होतं”. एका युजरने विनोद केला की, “आता तर फायरप्रूफ छत्र्‍या विकल्या जातील”.

आधी असे शो झाले आहेत?

लिउयांग शहराला आतषबाजीची राजधानी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो लोक हा शो पाहण्यासाठी गर्दी करतात. चायना डेलीने वृत्त दिले की, जानेवारीमध्ये नवीन वर्षाच्या उत्सवासाठी सुमारे १ लाख ६० हजार लोकांनी शहराला भेट दिली होती. जेव्हा तंत्रज्ञान आणि कलेचं संतुलन नसते तेव्हा सौंदर्यसुद्धा मोठं संकट ठरू शकतं.