TCS Employee portest for pending salary: भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. आधी १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा, त्यानंतर पगारवाढ करण्यास दिलेला नकार, यामुळे कंपनीच्या धोरणावर सोशल मीडियावरून टीका करण्यात आली. आता पुण्यातील एका कर्मचाऱ्याचा पगार थकवल्यामुळे टीसीएसची चर्चा आहे. पगार थकवलेला कर्मचारी सौरभ मोरे याने पुण्यातील कार्यालयाबाहेर फूटपाथवर झोपून कंपनीचा निषेध केला. २९ जुलै पासून सौरभ मोरे हा कर्मचारी फूटपाथवर राहत असून त्याचा फोटो आता व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये सौरभ मोरे फूटपाथवर झोपला असून त्याने त्याची बॅग उशाला घेतलेली दिसत आहे. तसेच त्याच्या बाजूला हाताने लिहिलेले एक पत्रही दिसत आहे.
पत्रात काय म्हटले?
या पत्रात कर्मचारी सौरभ मोरेने लिहिले की, मी २९ जुलै रोजी पुण्यातील सह्याद्री पार्क येथील टीसीएसच्या कार्यालयात गेलो होतो. माझा अल्टीमॅटीक्स आणि टीसीएस सिस्टीमवरील आयडी पूर्ववत केलेला नाही. तसेच मला अद्याप माझा पगार मिळालेला नाही. ३० जुलै २०२५ रोजी झालेल्या मीटिंगमध्ये मला पगार देण्याचे मान्य करण्यात आले होते.
“त्यादिवशी बैठकीत मला सांगण्यात आले होते की, दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ जुलै रोजी माझ्या खात्यात पगार जमा होईल. मी एचआरला कळवले की, माझ्या खात्यात पैसे आलेले नाहीत. तरीही मला कार्यालयाच्या बाहेर फूटपाथवर झोपण्यास भाग पाडले आहे. एचआर मला आता काहीच उत्तर देत नाहीये. त्यामुळेच २९ जुलैपासून मी इथे फूटपाथवर आहे”, असे सौरभ मोरे याने पत्रात लिहिले आहे.
आयटी कर्मचारी संघटनेकडून सौरभला पाठिंबा
फोरम फॉर आयटी इम्पलॉईज (FITE) या संघटनेने सौरभच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. आम्ही सौरभच्या मागणीचे समर्थन करत आहोत. त्याने उचललेले धाडसाचे पाऊल कर्मचाऱ्यांविरोधात होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे ठरेल.
तसेच संघटनेने पुढे म्हटले की, कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचे आणि कामाबद्दलचे विषय कामगार कार्यालयाच्याही निदर्शनास आणून दिले पाहिजेत. निषेध करणे हा चांगला आणि धाडसी पर्याय असला तरी त्याला कायदेशीर लढ्याची जोड दिल्यास कंपनीविरोधातला लढा आणखी बळकट होतो.
टीसीएसने काय म्हटले?
दरम्यान आता टीसीएसकडून यावर निवेदन देण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्याची कामावर अनियमित उपस्थिती राहिल्यामुळे त्याचा पगार रोखण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. कर्मचारी कार्यालयात अवैध पद्धतीने अनुपस्थित राहिला होता, त्यामुळे नियमानुसार कर्मचाऱ्याचा पगार थकीत राहिला आहे, असे उत्तर कंपनीने फायनान्शियल एक्सप्रेसशी बोलताना दिले.
दरम्यान सदर कर्मचारी पुन्हा कामावर आला असून त्यानेच कामावर घेण्याची विनंती केली होती. कंपनीनकडून त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्याच्या ज्या काही अडचणी आहेत, त्या सोडविण्याचा प्रयत्न पारदर्शक पद्धतीने केला जात आहे, असेही कंपनीने म्हटले.