Viral Video : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध असे अभयारण्य आहे. भारतातील एकूण व्याघ्र प्रकल्पांपैकी हे एक असे वन्यजीव अभयारण्य आहे, जिथे वाघांची संख्या अधिक आहे. या अभयारण्यात वाघ, बिबटे, रानडुक्कर, अनेक पक्षी व प्राणी आढळतात. दरदिवशी हजारो लोक ताडोबा अभयारण्यात भेट देतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भर रस्त्यात काही पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले. एक नाही तर चक्क चार वाघांनी दर्शन दिले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ ताडोबा रोडवरील आहे या व्हिडीओमध्ये तुम्हाला भर रस्त्यात काही वाघ दिसतील आणि पर्यटकांनी हे वाघ बघण्यासाठी भयंकर गर्दी केलेली दिसून येत आहे. संतापजनक म्हणजे काही पर्यटक जिप्सीमधून खाली उतरून फोटो काढताना दिसत आहे आणि जोरजोराने ओरडताना दिसत आहे.
वाघांना तसेच वन्य प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी अभयारण्यात काही विशेष नियम आहेत. या नियमांनुसार जिप्सीमधून खाली उतरणे तसेच वाघांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणे हे पूर्णपणे निषिद्ध आहे.
ताडोबा अभयारण्यात जर वाघाचे दर्शन घ्यायचे असेल तर मार्च ते मे महिना उत्तम असतो कारण या दरम्यान वाघ पाण्याच्या शोधात त्यांच्या अधिवासाबाहेर पडतात. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने असेच हे चार वाघ पाण्याच्या शोधात बाहेर पडलेले असताना रस्त्यावर दिसून आले, ज्यामुळे पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले. या व्हिडीओमध्ये एक पर्यटक वाघाला पाहून म्हणाला, “चार वाघ, पूरा पैसा वसूल” अनेक पर्यटक वाघाला प्रत्यक्ष पाहून थक्क झाले.
पाहा व्हायरल व्हिडीओ
mahakali_ki_nagari_chandrapur या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ताडोबा रोडवर वाघ दिसून आले” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या पर्यटकांवर टीका केली आहे. अशा पद्धतीने वाघ बघणे चुकीचे आहे, असे काही युजर्स म्हणाले आहेत. एका युजरने लिहिलेय, “चूक जिप्सीचालकाची आहे” तर एका युजरने लिहिलेय, “वाघांनी यू टर्न मारला तर तुमची काही खैर नाही.” आणखी एका युजरने लिहिलेय, “असं जिप्सीतून खाली उतरून कोण फोटं काढतं”