Frog Found In Mess Food: भुवनेश्वरमधील एका प्रतिष्ठित कॉलेजच्या वसतिगृहाच्या मेसमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणात बेडूक आढळल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एका युजरने या घटनेचा धक्कादायक फोटो शेअर केला आहे. हा फोटो व्हायरल होताच वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हा फोटो पाहणाऱ्या अनेक युजर्सनी कॉलेजच्या जेवण आणि मेस व्यवस्थापनाविरोधी निषेध व्यक्त केला आहे. याशिवाय वसतिगृहातील दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

@aaraynsh नावाच्या एका ट्विटर युजरने हा फोटो शेअर करत लिहिले की, हे KIIT भुवनेश्वर आहे, जे भारतातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ४२ व्या क्रमांकावर आहे. इथे पालक आपल्या मुलांना इंजिनिअरिंगची डिग्री मिळवण्यासाठी सुमारे १७.५ लाख रुपये खर्च करतात. पण, या कॉलेजच्या वसतिगृहात अशाप्रकारचे जेवण दिले जाते. अशा परिस्थितीत भारतातील विद्यार्थी चांगल्या शिक्षणासाठी आणि सुविधांसाठी इतर देशांत जातात तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.

कंत्राटदाराच्या पगारात कपात

विद्यार्थ्याच्या पोस्टनंतर या प्रकरणाला आणखीनच महत्व प्राप्त झाले आहे. यानंतर कॉलेज प्रशासनानेही या घटनेवर आपले स्पष्टीकरण जारी केले आहे. या घटनेबाबत मेसच्या ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी कॉलेज व्यवस्थापनाकडून एक परिपत्रकही जाहीर करण्यात आले आहे. तसेच मेस कंत्राटदारावर कारवाई करत त्याचा एक दिवसाचा पगार कापण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ठेकेदाराला इशारा

कॉलेजच्या परिपत्रकात ही बाब अतिशय गंभीर असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. त्यात असे लिहिले आहे की, ही बाब विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारी आहे, त्यामुळे ठेकेदाराला अधिक सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कॉलेजच्या मेसमधील किचन, त्याची स्वच्छता आणि खाद्यपदार्थांचा दर्जा राखण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.

या घटनेवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यापैकी एक त्याच कॉलेजचा विद्यार्थी होता. त्याने लिहिले की, मी देखील त्याच वसतिगृहातील विद्यार्थी आहे. या वसतिगृहात बहुतेक परदेशातील विद्यार्थी आहेत. मेसमध्ये शेकडो विद्यार्थी जमले होते. या घटनेच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल केली असून आता वसतिगृह आणि संबंधित लोकांवर कारवाई केली जाईल. आपल्या अनुभवाबद्दल एका युजरने लिहिले की, मला तो दिवस आठवतोय जेव्हा मला वसतिगृहाच्या जेवणात ब्लेड मिळाले होते. यावर तिसऱ्या एकाने लिहिले की, एकदा आमच्या वसतिगृहातील मेसमधील जेवणात सरडा सापडला होता. यानंतर मी संपूर्ण सेमिस्टर मेसमध्ये जेवलो नाही.