Gautami Patil Lavani Video Controversy: प्रसिद्ध लावणी नर्तिका गौतमी पाटीलचा डान्स आणि त्यावरून वाद हा ससेमिरा काही केल्या संपायचं नावच घेत नाही. गौतमीचा डान्स बघायला आलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन अलीकडेच मिरज तालुक्यातील बेडग येथील दत्तात्रय ओमासे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गौतमीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा असी मागणी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली होती. हे प्रकरण शांत होत ना होतच तोवर गौतमीच्या चाहत्यांनी लावणीच्या कार्य्रक्रमात स्टेजवर चढून धिंगाणा घातला होता. गौतमीवर दगडफेकही झाली होती. आता हा गोंधळ पाहता गौतमीच्या लावणी कार्यक्रमावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी मागणी होत आहे. यावर आता पहिल्यांदाच गौतमीने मौन सोडलं आहे.

टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटील म्हणाली की, ग्रामीण भागातील प्रेक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे. लोकांच्या प्रेमामुळं मी आज इथे आहे. मी एक कलाकार आहे. गावोगावी जाते आणि कार्यक्रम सादर करते. सुरुवातीला काही चुका झाल्या असतील. पण, आता सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे.

कोण काय बोलतं त्यावर मला काही बोलायचं नाही. मी माझी कला सादर करते. त्यात कोणत्याही प्रकारचा अश्लीलपणा नाही. मी स्टेजवर असताना खाली काय चाललं हे मला माहीत नसतं. कार्यक्रमाला किती लोकं येतील, हे ही मला माहीत नसते. माझ्या कार्यक्रमात फक्त पुरुषच नव्हे तर त्यांच्या बायका सुद्धा येतात. अनेक महिला, मुली सुद्धा माझा डान्स प्रेमाने, आवडीने बघतात. तरीही गौतमीमुळं काही झालं असं म्हणालं तर ते चुकीचं आहे.

दरम्यान, अलीकडेच लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी नव्या नृत्यांगणांनी अश्लीलपणा करू नये, असं सांगितलं. अश्लीलपणा दाखविल्यास महाराष्ट्राचा बिहार व्हायला काही वेळ लागणार नाही असेही पुणेकर म्हणाल्या होत्या. यावर पहिल्यांदाच भाष्य करत गौतमी म्हणाली की, त्या वयाने मोठ्या आहेत. त्यांचा तो अधिकार आहे. आम्ही अश्लीलपणा होणार नाही, याची नेहमी काळजी घेतो.

हे ही वाचा<< गौतमी पाटीलच्या एका शोचं मानधन ऐकून व्हाल थक्क; खऱ्या आयुष्याबद्दल गौतमी म्हणते, “मी खूप..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौतमीने पहिल्यांदा अकलूज येथील लावणी महोत्सवात बॅक आर्टिस्ट म्हणून गौतमीने सादरीकरण केले होते. पहिल्यांदा लावणी केल्यावर गौतमीला ५०० रुपये मानधन मिळाले होते आता आपण शो साठी हजारो रुपयांचे मानधन घेत असल्याचे गौतमीने मागे एका कार्यक्रमात सांगितले होते.