Girlfriend Entry in Boyfriend Wedding Video : अनेक मुलीचं स्वप्न असतं की, आपलं लग्न आपल्या प्रियकराबरोबर व्हावं, यासाठी त्या खूप प्रयत्न करतात. प्रियकराला आयुष्याचा जोडीदार बनविण्यासाठी त्या घरच्यांची सहमती मिळविण्याचा प्रयत्न करतात. पालकांच्या एका होकाराची त्या वाट पाहत असतात. मात्र, इतके प्रयत्न करूनही काही वेळा प्रेमात धोका मिळतो आणि त्यानंतर होत्याचं नव्हतं होऊन बसतं. असाच काहीसा प्रकार ओडिशातील भुवनेश्वर येथील एका लग्न समारंभात पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

चक्क मंडपातील सर्वांनाच पोलीस ठाणे गाठण्याची आली वेळ

व्हिडीओत एक प्रियकर प्रेयसीला प्रेमात धोका देत दुसऱ्याच मुलीसह लग्नगाठ बांधत होता, हे समजताच प्रेयसीनं भरमंडपात एन्ट्री घेत पुढे जे काही केलं, ते पाहून तुम्हीही चकित व्हाल. त्यानंतर चक्क मंडपातील सर्वांनाच पोलीस ठाणे गाठण्याची वेळ आली. या व्हिडीओतील प्रियकरानं प्रेयसीला लग्नाचं वचन दिलं; पण तो ऐन वेळेला धोका देऊन, दुसऱ्याच मुलीशी लग्न करीत होता. ही बाब समजताच प्रेयसीनं पोलिसांना घेऊन थेट लग्नमंडपात एन्ट्री घेतली आणि नवरदेवाची चांगलीच धुलाई केली. भुवनेश्वरमधील धौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही घटना घडली.

लग्नाच्या काही दिवस आधीपासून त्यानं तिच्या कॉल, मेसेजकडे केलं दुर्लक्ष

पीडित प्रेयसीनं पोलिसांना सांगितलं की, दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न करणाऱ्या प्रियकराबरोबर ती अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. त्यानं तिला लग्नाचं आश्वासनही दिलं होतं. तसेच तिचा त्याच्याबरोबर आधीच साखरपुडाही झाला होता. मात्र, कशाचीही कल्पना न देता प्रियकरानं दुसऱ्याच मुलीशी लग्नाचा घाट घातला. लग्नाच्या काही दिवस आधीपासून त्यानं तिच्या कॉल, मेसेजकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तरुणीनं पोलिसांनाबरोबर थेट लग्नमंडपात एन्ट्री घेतली. तरुणी तिथवरचं थांबली नाही. तिनं रिसेप्शन सुरू असताना मंडपात जाऊन प्रियकराला मारहाण केली.

पीडित प्रेयसीनं भर लग्नमंडपात पाहुण्यांसमोर असा आरोप केला की, दुसऱ्या मुलीसह लग्न करणाऱ्या तिच्या प्रियकरानं तिचा मानसिक छळ करीत धोका दिला आहे. तसेच त्यानं तिच्याकडून पाच लाख रुपये घेतल्याला दावा केला. या सर्व आरोपांनंतर प्रेयसीचा रुद्रावतार बघून उपस्थित पाहुणे मंडळीदेखील गोंधळात पडली. त्यानंतर अखेर सर्वांनी बोहल्यावर चढलेल्या नवरदेव प्रियकरासह चौकशीसाठी पोलीस ठाणे गाठले.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पीडित प्रेयसी बोहल्यावर चढलेल्या नवरदेव प्रियकराला भरमंडपात पाहुण्यांसमोर मारहाण करताना दिसत आहे. यावेळी तिच्याबरोबर तिचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. त्यांनीही त्याला सर्वांसमोर मारण्याचा प्रयत्न केला; मात्र उपस्थितांनी मध्यस्थी करीत ही हाणामारी थांबवली. त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली.