Vadodara Pani Puri Protest Video Viral: अन्याय झाल्यावर निदर्शन, आंदोलन, निषेध वगैरे करण्याची पद्धत आहे. गुजरातच्या वडोदरा येथे एका महिलेनं रस्त्याच्या मधोमध बसून निषेध आंदोलन केलं. माझ्यावर अन्याय झाला, असं या महिलेचं म्हणणं होतं. आता या महिलेवरचा अन्याय ऐकाल तर तुम्हालाही हसू आवरणार नाही. २० रुपयांत सहाऐवजी चारच पाणीपुरी दिल्या, असा आरोप करत महिलेनं निदर्शन करत वाहतूक रोखून धरली. या मजेशीर घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

वडोदराच्या सुरसागर परिसरातील रहदारीचा रस्ता या महिलेनं रोखून धरला. पाणीपुरीवाल्यानं माझ्यावर अन्याय केला, असं सांगून सदर महिला धायमोकलून रडतही होती. हा प्रकार बघण्यासाठी बघ्यांनीही मोठी गर्दी केली. त्यामुळं वाहतुकीचा खोळंबा झाला.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत सदर महिला रडताना दिसत आहे. २० रुपयांच्या पाणीपुरी प्लेटमध्ये चारच पाणीपुरी दिल्या, असा तिचा आरोप होता. अखेर वाहतूक कोंडी झाल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. यानंतर व्हायरल व्हिडीओत पोलीस सदर महिलेची समजूत काढताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या?

सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता यावर गमतीशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दोन पाणीपुरीसाठी सत्याग्रह करायला लागला, अशी मजेशीर प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटले, “पाणीपुरी चाहत्यांचा उत्साह एकदम भारी आहे. आपण गुजरात सरकारकडून याचं उत्तर मागितलं पाहिजे.” आणखी एका युजरनं लिहिलं की, या महिलेनं न्यायालयात गेलं पाहिजे. कारण आजकाल न्यायालय विचित्र वाटणाऱ्या प्रकरणातही न्याय देत आहे.

पोलिसांशी बोलताना सदर महिनेले सांगितले की, पाणीपुरीवाला नेहमीच कमी पाणीपुरी देतो, तसेच त्याला काही बोलल्यास माजही दाखवतो. महिलेच्या तक्रारीनंतर वडोदरा महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर तक्रारीवरून आम्ही पाणीपुरी विक्रेत्यावर कारवाई करू शकत नाहीत. यासाठी अन्न सुरक्षा विभागाकडून त्याच्या खाद्यपदार्थांची तपासणी करावी लागेल.