आजचा दिवस आपल्यासाठी नेहमीसारखा दिवस असला तरी परदेशात मात्र ३१ ऑक्टोबर दिवस ‘भूतांचा’ दिवस म्हणून ओळखला जातो. अनेक पाश्चिमात्य देशात आज ‘हॅलोविन नाइट’ साजरी केली जाते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे पितृपक्ष असतो तसाच काहीसा हा दिवस असतो.

यादिवशी अनेक मृत आत्मे पृथ्वीवर येतात, असा समज आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी खास केक आणि इतर पदार्थांची मेजवानी केली जाते. युरोप, अमेरिकेतल्या अनेक ख्रिश्चन देशांत ‘हॅलोविन नाइट’ खूपच अनोख्या पद्धतीनं साजरी केली जाते. या दिवशी लोक भूतांचे कपडे परिधान करून रस्तोरस्ती फिरतात. फक्त मोठी माणसंच नाही तर लहान मुलंदेखील मोठ्या संख्येनं ‘हॉलोविन नाइट’मध्ये सहभागी होतात. लहान मुलंदेखील भूतांचे कपडे परिधान करून रात्री ‘ट्रिक ऑर ट्रीट’ म्हणत घरोघरी फिरतात. प्रत्येकाच्या घरी जाऊन खाऊ गोळा करतात आणि जर कोणी खाऊ द्यायला नकार दिला की मात्र त्यांची काही खैर नसते. या दिवशी काही जण वेगवेगळी शक्कल लढवत शेजारी पाजाऱ्यांना घाबरवून सोडतात आणि याबदल्यात कोणीही रागे भरत नाही, कारण आजच्या दिवशी सारं काही माफ असतं.

तसा या सणाला फार जुना इतिहास नसला तरी मजा मस्ती करण्यासाठी मोठ्या उत्साहात हॅलोविन नाइट साजरी केली जाते. या दिवशी ‘जॅको लँटर्न’ला खास महत्त्व असतं. जॅको लँटर्न म्हणजे भोपळ्यापासून तयार केलेला खास कंदील. या दिवशी प्रत्येक घरांसमोर भयावह चेहरा कोरलेला भोपळा ठेवला जातो. भोपळ्यात एक मेणबत्तीदेखील ठेवली जाते. त्यामुळे रात्री लांबून पाहिले तर भूतच आहे असे भासते. या दिवशी खास अनेक गावांतून मोठ्या प्रमाणात भोपळ्यांची आयात केली जाते. दृष्ट आत्म्यांना हे भोपळे दूर ठेवतात अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे या सणात भोपळ्यांना मोठं महत्त्व आहे.