तुम्ही अनेकांना प्रेमात पडताना पाहिले असेल. मात्र प्रेमाचा स्वीकार करताना कोणी शब्दश: पडल्याचे तुम्ही केव्हाच पाहिले नसेल. मात्र मेक्सिकोमध्ये असा प्रकार घडला आहे. ती आली, त्याने प्रपोज केले आणि ती भोवळ येऊन पडली, असा हा प्रकार आतापर्यंत ४० लाखांहून अधिक जणांनी युट्यूबवर पाहिला आहे.
मेक्सिकोत राहणारी मॉडेल रेयना रेन्टेरियाला जर्मन बेनिटेझ नावाच्या तरुणाने लग्नासाठी मागणी घातली. जर्मन हातात अंगठीचा बॉक्स घेऊन उभा असताना रेयना त्याच्या समोर आली. आजूबाजूला छान संगीत वाजत होते. जर्मन आणि रेयना एका अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होणार होते. मात्र जर्मनने प्रपोज करताच भोवळ आल्याने रेयना जागीच कोसळली. रेयना कोसळताच जर्मनने लगेचच तिच्या मदतीसाठी पुढे सरसावला.
अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यानंतर रेयनाने जर्मनला होकार दिला. रेयनाच्या प्रकृतीत आता सुधारणा होते आहे. ‘मी अत्यंत उत्सुक होते. त्यानंतर जे घडले ते अविश्वसनीय होते. मला धक्का बसला. मात्र आता मी सुरक्षित आणि आनंदी आहे’, असे रेयनाने फेसबुकवर म्हटले आहे.
प्रिय व्यक्तीने केलेले प्रपोज ही घटना आयुष्यभर लक्षात राहणारी असते. मात्र जर्मन आणि रेयनाला हा क्षण एका वेगळ्याच कारणामुळे कायम लक्षात राहणार आहे. अचानक भोवळ येऊन पडल्याने रेयनाला ‘तो’ खास क्षण नीट अनुभवता आला नाही. मात्र कोणत्याही गोष्टीचा शेवट गोड होणे महत्त्वाचे असते. जर्मन आणि रेयनाच्या बाबतीत थोड्या वेगळ्या प्रकारे या गोष्टीचा शेवट गोड झाला आहे.