दुचाकी चालवणे अनेकांना आवडते, मात्र यावेळी हेल्मेट घालणे प्रत्येकाला आवडतेच असे नाही. तुम्हीही बाईक चालवण्याच्या वेळी हेल्मेट घालायला टाळाटाळ करता का? मग हा व्हिडीओ तुमच्यासाठीच आहे. दिल्ली पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याबरोबर त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, “God helps those who wear helmet!” म्हणजेच ‘देवसुद्धा त्यांनाच मदत करतो जे हेल्मेट घालतात!’

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. यामध्ये आपण पाहू शकतो की अवघ्या १० सेकंदांमध्ये एका दुचाकीस्वाराचा दोनदा अपघात झाला. मात्र त्याने हेल्मेट घातलेले असल्यामुळे त्याला दोन्हीवेळेस जीवनदान मिळाले. लोकांमध्ये वाहतुकीचे नियम आणि रस्ते सुरक्षेच्याबाबतीत जागरूकता वाढावी यासाठी दिल्ली पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

होणाऱ्या सुनबाईंसह मुकेश अंबानींनी घेतले तिरुपतीचे दर्शन; मंदिराला दिली ‘इतक्या’ कोटींची देणगी

या व्हिडीओमध्ये एका रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले आहे. यामध्ये एक दुचाकीस्वार घसरून बाईकवरून खाली पडतो. यावेळी त्याने त्याचा संपूर्ण चेहरा झाकला जाईल असे हेल्मेट घातलेले आहे. त्यामुळेच तो या अपघातातून बचावतो. मात्र तो उठून उभा राहतो तोच शेजारी असलेला विजेचा खांब त्याच्या डोक्यावर पडतो. पण सुदैवाने त्याच्या हेल्मेटमुळे तो पुन्हा बचावतो.

रस्ते अपघातात हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या आपण दररोज वाचतो. यामुळेच रस्ते सुरक्षा हा चर्चेत असतो. यासाठीच वाहतूक पोलिस वेळोवेळी नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत १ मिलिअनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.