शुल्लक कारणावरुन अनेकदा वाद होत असल्याचे आपल्याला ऐकायला मिळत असते. अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या व्यावसायिकाच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. व्यावसायिक आणि अमेरिकन महिलेमध्ये झालेल्या वादात कुत्र्यांना लक्ष्य करण्यात आल्याने या वादाची सध्या सर्वत्र चर्चा रंगताना दिसत आहे. आपल्या घरासमोरुन कुत्र्यांना घेऊन फेरफटका मारणाऱ्या महिलेसोबत वाद झाल्याने भारतीय वंशाचा अमेरिकन हॉटेल व्यावसायिकने तिच्या दोन्ही कुत्र्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कृत्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. याप्रकरणानंतर त्याला अटक देखील करण्यात आली. अमेरिकन वृत पत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७ ऑक्टोबरला एक महिला विक्रम चटवाल याच्या न्यूयॉर्कस्थित घरासमोर दोन कुत्र्यांसोबत फेरफटका मारत होती. यावेळी विक्रमने बाहेर येऊन या महिलेसोबत वाद घातला. आपल्या रागाचा पारा चढल्यानंतर त्याने यावेळी आपल्या खिशातून लायटर काढून चक्क कुत्र्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कुत्र्यांना गंभीर इजा झालेली नाही. या प्रकारानंतर संबंधित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेच्या वेळी विक्रमने कुत्र्यांना मारण्याची धमकी दिल्याचे महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
विक्रमला ५० हजार डॉलरचा दंड भरल्यानंतर जामिनावर सोडण्यात आले आहे. ड्रीम ग्रुप हॉटेल ग्रुपचा संस्थापक असणारा विक्रम चटवाल यापूर्वी देखील तो अनेक वादग्रस्त कृत्यांमुळे चर्चेत आला होता. २०१३ मध्ये ड्रग्स बाळगल्याप्रकरणी त्याला अमेरिकेच्या विमानतळावर पकडण्यात आले होते यासाठी त्याला तुरुंगातही जावे लागले होते. हॉलिवू़ड अभिनेत्री लिंडसे लोहान हिच्या सोबत असणाऱ्या प्रेमप्रकरणामुळे देखील विक्रम चांगलाच चर्चेचा विषय बनला होता.
विक्रमने २००६ मध्ये प्रिया नावाच्या युवतीसोबत विवाह थाटला होता. या विवाहासाठी त्याने तब्बल १०० कोटी खर्च केल्याने तो चर्चेत आला होता. भारतातील सर्वाधिक खर्चिकविवाह सोहळ्यामध्ये विक्रमच्या विवाहाचा समावेश होतो.