सध्या सर्वत्र भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याची चर्चा रंगली आहे. भारत आणि पाकिस्तान यांचा सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे आणि या सामन्यासाठी खेळाडूंसोबत चाहतेसुद्धा खूप उत्सुक आहेत. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, क्रिकेटच्या एक दिवसीय सामन्यात पांढऱ्या रंगाचा तर टेस्ट क्रिकेटदरम्यान लाल रंगाचा लेदर बॉलचा उपयोग करण्यात येतो. तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात लाल रंगाचा लेदर बॉल (Red Leather ball) कसा तयार करण्यात येतो, हे दाखवण्यात आले आहे.
सगळ्यात आधी लाल रंगाच्या लेदरला विशिष्ट आकारात कापून घेतलं जातं. त्यानंतर लेदरच्या कापून घेतलेल्या भागाला छोट्या माशाच्या आकारात कापण्यात आले आहे. तसेच माशाच्या आकारात कापून घेतलेल्या तुकड्यांना लाकडावर ठेवून धाग्याने शिवून घेतलं जात आहे आणि बॉलचा अर्धवर्तुळाकार भाग तयार करून घेतला आहे. त्यानंतर त्यामध्ये फेव्हिकॉल लावून त्याला यंत्राच्या सहाय्याने गोलाकार आकार देण्यात आला आहे. तसेच बॉलच्या आत काहीतरी कठीण गोलाकार वस्तू टाकली जाते आहे आणि बॉलच्या दोन्ही भागांना एकत्र जोडले जात आहे. तसेच अगदी शेवटी बॉलचा वरचा भाग पांढऱ्या धाग्याने शिवण्यात आला आहे. लाल रंगाचा लेदर बॉल कसा तयार केला जातो एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
यंत्रांची मदती अन् कामगारांची मेहनत :
व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, पांढऱ्या धाग्याने शिवून घेतल्यानंतर बॉलला पुन्हा एकदा मशीनमध्ये टाकण्यात आले आहे. त्यानंतर ब्रशने लिक्विड लावल्यानंतर बॉल चमकदार दिसतो आहे. त्यानंतर बॉलला लाल रंगाच्या पाण्यात बुडवून घेतलं आहे आणि लाल रंगाचे लेदर बॉल विक्रीसाठी तयार करून ठेवले आहेत. अशाप्रकारे यंत्रांच्या मदतीने तसेच कामगारांच्या मेहनतीने क्रिकेट खेळातील हा खास बॉल तयार करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @yummybites_kt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. करिष्मा त्यागी असे या युजरचे नाव आहे. ही एक फूड ब्लॉगर आहे. पण, आज तिने क्रिकेट खेळात वापरला जाणारा लेदर बॉल कसा तयार होतो याची झलक दाखवली आहे. तसेच व्हिडीओ पाहून अनेक जण चेंडू तयार करणाऱ्या कामगारांच्या कौशल्याचे आणि मेहनतीचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.