भारतीय रेल्वेचा प्रवास म्हणजे एकदम स्वस्तात मस्त आणि तुलनेने अधिक आरामदायी. त्यामुळे रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रत्येकाला तिकीट मिळणे शक्य नसते. काही वेळा वेटिंगमुळे अनेकांची तिकिटे कन्फर्म होत नाहीत. अशा वेळी अनेक प्रवासी विनातिकीट, तर काही जण वेटिंग तिकिटावर आरक्षित डब्यात बसून प्रवास करण्याचा मार्ग निवडतात. त्यामुळे आरक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

सोशल मीडियाच्या या जमान्यात यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ आपल्यासमोर आले आहेत; ज्यामध्ये विनातिकीट प्रवासी स्वत:चा प्रवास सुखकर होण्यासाठी आधीच तिकीट काढलेल्यांशी भांडताना दिसले. प्रवाशांकडून अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने केल्या जात असल्या तरी आजही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. याबाबत एका सोशल मीडिया युजरने पोस्ट करीत भुज-शालीमार एक्स्प्रेसमधील त्याचा कटू अनुभव शेअर केला; जो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा : नवरी होती स्टेजवर अन् हेल्मेट घालून आला प्रियकर, लग्न मंडपात नवरदेवाला ढकलून केलं असं काही…; व्हिडिओ झाला व्हायरल)

या सोशल मीडिया युजरने आपल्या पोस्टमध्ये S5 कोचचा संदर्भ देत, सांगितले की, कोच विनातिकीट प्रवाशांनी भरलेला होता; ज्यामुळे तिकीट घेतलेल्या लोकांना खूप समस्यांना सामोरे जावे लागले. पोस्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, तेथे गर्दी इतकी मोठ्या प्रमाणात होती की, लोकांना त्यांच्या जागेवर पोहोचणे कठीण होत होते. युजरने आपल्या पोस्टमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि भारतीय रेल्वे यांना टॅग करून, ही समस्या सोडविण्याची विनंती केली.

या प्रकरणाने ट्विटरवर खळबळ उडाल्याने रेल्वेनेही या घटनेची दखल घेतली. रेल्वेने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डल रेल्वे सर्व्हिसवरून ट्विट केले, “प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांचा प्रवास आरामदायक व्हावा यासाठी पावलं उचलली जातील.”

रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकरणांमध्ये नेहमी एकच उत्तर मिळत असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे लोकांना ते पटले नाही. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी सांगितले, “अशा तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून बळजबरीने जागा बळकावण्याचा धोका वाढला आहे.” हे प्रकरण केवळ स्लीपर कोचपुरते मर्यादित नाही, असेही लोकांकडून सांगण्यात आले. एसी डब्यातील प्रवाशांबाबतही अशा घटना घडतात; मात्र दोषींवर कारवाई होत नाही, अशा प्रकारे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.