भोला हा अजय देवगणचा सिनेमा गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा पाहून आल्यानंतर पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर पतीने पत्नीला मारहाण केली. हे प्रकरण एवढं वाढलं की पुढे पोलीस ठाण्यात गेलं. गुजरातमधल्या भुजमधलं हे अजब प्रकरण समोर आलं आहे. या भांडणाचं कारण ऐकून तुम्हीही चकित व्हाल.

काय घडला प्रकार?

भोला सिनेमा पाहून आल्यानंतर गुजरातमधल्या भूजमध्ये राहणाऱ्या पतीने आपल्या पत्नीला मारहाण केली. हा सिनेमा अत्यंत बकवास आहे. या सिनेमात माझे पैसे वाया गेले असं हा पती पत्नीला म्हणाला. त्यानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाला. यानंतर हा वाद विकोपाला गेला आणि पत्नीने पतीविरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. आपल्या पतीने आपल्याला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार पत्नीने पोलिसात केली. त्यानंतर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुजमधल्या नागचकला भागात राहणाऱ्या कृष्णाबा यांनी त्यांचे पती अमरसिंह मोडे यांच्या विरोधात मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृष्णाबा यांनी काय म्हटलं आहे तक्रारीत?

कृष्णाबा यांनी हा आरोप केला आहे की, मी माझ्या पतीसह भोला हा सिनेमा पाहण्यास गेली होती. घरी आल्यावर ते मला म्हणाले की मला सिनेमा अजिबात आवडला नाही. माझे पैसे वाया गेले. त्यानंतर माझ्यावर चिडले आणि मला मारहाण केली तसंच मला जीवे मारण्याची धमकी देऊन म्हणाले आज तुला मी जिवंत सोडणार नाही. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे मारहाण केल्याने महिलेला दुखापत झाली. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पती आणि पत्नी यांच्यात झालेल्या भांडणाचं कारण ऐकून पोलीसही चकित झाले आहेत. आज तकने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.