देशात बेरोजगारीने कळस गाठला आहे. लाखो करोडो तरुण पदवीधर असूनही त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही. तर ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना महागाईमुळे आहे तो पगार पूरत नाहीये. त्यामुळे बेरोजगार तरुणांसह नोकरी करणारेही संधी मिळेल तिथे नोकरीसाठी अक्षरश: धावत आहेत. यात सरकारी नोकरीच्या संधीकडे तर अनेक तरुण मंडळी डोळे लावून बसलेली असते. यातच हैद्राबादमधील एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यात नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी लाखो तरुणांची गर्दी केल्याचे दिसून येत आहे, ही गर्दी पाहून अनेकांना तर धक्काच बसला आहे. यावरुन तुम्हाला देशातील बेरोजगारीचा अंदाज आला असेल.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एकाचवेळी हजारो तरुण नोकरी मिळवण्यासाठी एका इमारतीत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. गेटबाहेर तरुण-तरुणींची झुंबड उभी असल्याचे पाहायला मिळते. यावेळी त्यांच्या हातात स्वत:चे डॉक्युमेंट्स दिसत आहेत. गर्दी एवढी आहे की लोकांमध्ये उभे राहायलाही जागा नाही. जेव्हा व्हिडिओ बनवणारी व्यक्ती कॅमेरा फिरवते तेव्हा दूरवर फक्त तरुण-तरुणीच दिसत आहेत. यात इमारतीच्या गेट लहान असल्याने तरुणांची प्रचंड गर्दी उसळून आली होती. अशापरिस्थितीत या तरुणांना आवरायचे असा प्रश्न सुरक्षारक्षकांनाही पडला होता.
हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडिया यूजर्स आपली मते मांडत आहेत. काहींनी ही परिस्थिती खूप भयावह असल्याचे म्हटले आहे, तर काहीजण मजा घेत आहेत. हा व्हिडिओ @IndianTechGuide या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, भारतात वॉक-इन मुलाखतीची स्थिती. या व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहे. एका युजरने लिहिले की, भंडाऱ्यासाठीही एवढी गर्दी नसते. यावर युजर्सनी चिंता व्यक्त करत लिहिले की, बेरोजगारी भयंकर आहे, तर आणखी एकाने लिहिले की, या डिजिटल जगात अनेक गोष्टी दिवसेंदिवस खराब होत आहेत.