Apple iPhone 17 sale starts from today: आज संपूर्ण भारतात आयफोन १७ सिरीजची विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे उत्साही ग्राहकांनी भारतातील प्रमुख शहरांमधील अ‍ॅपल स्टोअरमध्ये चांगलीच गर्दी केली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे आणि बंगळुरूमधील अ‍ॅपल स्टोअर्सबाहेर मोठ्या संख्येने लोकांनी रांगा लावल्या आहेत. काही जण जुन्या सिरीजचा आयफोन नवीन सिरीजमध्ये बदलण्यास उत्सुक आहे, तर काही जण पहिल्यांदाच आयफोन खरेदी करत आहेत. दिल्लीतील आयफोन १७ खरेदी करणाऱ्या अशाच एका उत्साही ग्राहकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो पहिल्यांदाच फोनचा कॉस्मिक ऑरेंज रंग दाखवून त्याचे कौतुक करताना दिसत आहे.

आयफोन १७ खरेदी केल्यानंतर दिल्लीतील या ग्राहकाने आनंद व्यक्त करत म्हटले की, फोनचा हा केशरी रंग अगदी जबरदस्त आणि सुंदर दिसत आहे. यावेळी केशरी रंगाची क्रेझ जास्त असेल, कारण भारतात भगवा रंग खूप खास आहे. मी मुस्लिम आहे, पण मला हा रंग खूप आवडतो. असं म्हणत त्याने घेतलेल्या नव्या कोऱ्या आयफोनला तो किस करत फ्लाँट करताना या व्हिडीओत दिसत आहे.

हा व्हिडीओ पीटीआयने त्यांच्या एक्सवर शेअर केला आहे. दिल्लीमधील साकेत इथल्या अधिकृत अ‍ॅपल स्टोअरमध्ये फोन खरेदी करणारा हा पहिला ग्राहक ठरला आहे. फोन खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच रांगेत असल्याचे त्याने यावेळी सांगितले.

अ‍ॅपलची आयफोन १७ सिरीज आता संपूर्ण भारतात खरेदीसाठी उपलब्ध आहे. नवीन आयफोन अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत, तसंच ग्राहक थेट अ‍ॅपल स्टोअर इंडिया आणि देशभरातील अधिकृत रिटेल आउलेटवरून देखील खरेदी करू शकतात. अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट या दोघांनाही आकर्षक लाँच ऑफर्स आणि ईएमआय पर्यायही आहेत. काही प्रमुख शहरांमध्ये आयफोन २ ते ३ दिवसांच्या डिलिव्हरीसाठी उपलब्ध आहेत.