सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शिवाय सोशल मीडियावर प्रत्येक व्हिडीओंचा एक ट्रेंड सेट असतो. त्यामुळे हे व्हिडीओ अपलोड करणारे बरोबर वेळ साधत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. ज्यामुळे तो अनेक लोकांना आवडतात आणि मोठ्या प्रमाणात पाहिले जातात.
त्याप्रमाणे सध्या लग्नाचा हंगाम सुरु असल्यामुळे अनेक वधू-वरांनी केलेल्या भन्नाट डान्सचे तर कधी लग्न मंडपात नवऱ्या मुलाच्या मित्रांनी केलेल्या डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशातच काल काही मुलांनी लग्न मंडपात स्वयंपाक बनवण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी घेऊन डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे.
या सगळ्यामध्ये लग्नमंडपात नवरा-नवरीचे लग्न लावून देणाऱ्या गुरुजींचेदेखील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही दिवसांपुर्वी एका लग्नात गुरुजींनी चक्क इंग्रजीमध्ये मंगलाष्टका म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच आता अशाच एका गुरुजींचा लग्न लावतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असून व्हिडीओत हे गुरुजी भंयकर रागवल्याचं दिसून येतं आहे. शिवाय ते ‘लग्न लावू का थांबवू’ असं म्हणताना दिसतं आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
हेही पाहा- Video: मराठमोळ्या लग्नात गुरुजींनी गायली इंग्रजी मंगलाष्टके; नेटकरी म्हणतात, “यांना तोड.. “
त्याचं कारण म्हणजे हे गुरुजी नवरा-नवरीचं लग्न लावत असताना काही मुलं त्यांना जोरात अक्षता मारताना दिसतं आहेत. गुरुजींनीदेखील काही वेळ ते सहन केलं. मात्र, जेव्हा त्यांच्या गालावर एका मुलाने फेकलेल्या अक्षता जोरात लागल्या तेंव्हा मात्र ते भडकल्याचं दिसतं आहेत. तर ‘मंगलाष्टका म्हणायच्या का बंद करायच्या सांगा’ असं ते मुलांना म्हणत आहेत. गुरुजी या व्हिडीओमध्ये रागवल्याचं दिसतं असलं तरी मुलांसह नवरा मुलगा मात्र हसताना दिसतं आहे. शिवाय नेटकऱ्यांना तर हा व्हिडीओ खूप आवडला आहे.