साधरण पंधरावर्षांपूर्वी खिशात थोडेसे पैसे घेऊन चेरियन युएईत गेले होते. पंधरा वर्षे येथे मेहनत केल्यानंतर त्यांनी व्यावसायात चांगलाच जम बसवला. ४९ वर्षांचे साजी चेरियन हे सध्या आखाती देशात कौतुकाचा विषय ठरले आहेत. चेरियन हे ख्रिश्चन आहेत पण इथे नशीब आजमवण्यासाठी आलेल्या अनेक कामगारांसाठी त्यांनी कामगार वस्तीच्या शेजारी मशीद बांधली आहे.

संयुक्त अरब अमिरातीत नशीब आजमवण्यासाठी दरवर्षी हजारो लोक येतात. येथे कामगार वर्ग मोठा आहे. मुख्य शहरापासून दूर हा कामगार वर्ग राहतो. कामगारांच्या वस्तींची यापूर्वीची बिकट परिस्थिती अनेकदा समोर आली आहे. ती चेरियन यांनी जवळून पाहिली आहे. इथल्या कामगारांना नमाज पठणासाठी दरदिवशी मुख्य शहरात असलेल्या मशीदीत जाव लागतं. कामगार वस्ती ते मशीद हे अंतर जास्त असल्यानं कामगारांना या प्रवासासाठी पैसेही खर्च करावे लागतात. त्यामुळे त्यांच्यासाठी चेरियन यांनी स्वखर्चातून येथे मशीद बांधली. यासाठी त्यांना कोट्यवधीचा खर्च आला.

मी ख्रिश्चन असून मशीद बांधत आहोत हे समजल्यावर अनेकांनी कौतुक केलं. मशीद बांधण्याच्या पवित्र कार्यात अनेकांनी मला मदत देऊ केली. कोणी आर्थिक सहकार्य करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी बांधकामाचं साहित्य देण्याची तयारी दर्शवली, पण मला मात्र स्वखर्चातून ही मशीद बांधायची होती. इथल्या कामगारांसाठी मला काहीतरी करायचं होतं म्हणून प्रांजळपणे मी मदत नाकारत गेलो. मशीद बांधणं हे नक्कीच माझ्यासाठी सोप्प काम नव्हतं, यासाठी अनेक अडचणी आल्या पण कामगारांच्या आनंदापुढे या अडचणी काहीच नव्हत्या अशी प्रतिक्रिया चेरियन यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे. चेरियन यांनी बांधलेल्या मशीदीत आज एका वेळी २०० हून अधिकजण नमाज पठण करू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.