Sundar Pichai Daily Salary: जगातील सर्वात मोठा टेक जाएंट असलेल्या गूगलचे सध्याचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका भाषणात जर आपण मनाचा कौल ऐकून काम केले नसते तर आज आयुष्य कसं असतं याविषयी खुलासा केला होता. २०२३ मधील या भाषणाचा व्हिडीओ मागील काही दिवसात सोशल मीडियावर शेअर होत आहे. पिचाई यांनी या भाषणात भारतीय विद्यार्थ्यांच्या ज्ञान व कौशल्याचे कौतुक करतानाच प्रगतीमध्ये येणाऱ्या एका मोठ्या अडथळ्याविषयी सुद्धा भाष्य केले होते. गूगलचे सीईओ म्हणतात की “व्यावहारिक अनुभवापेक्षा शैक्षणिक पदवीला भारतात दिल्या जाणाऱ्या महत्त्वामुळे अनेकदा विकासाची वाट कठीण होत जाते.”

तर यश वेगळं असतं..

सुंदर पिचाई यांनी २००४ मध्ये गूगलमध्ये रुजू होण्यापूर्वी इंजिनीअर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी क्रोम, जीमेल आणि अँड्रॉइड यांच्या उत्पादनांच्या विकासात मोलाची भूमिका बजावली होती. २०१५ मध्ये, गूगलची मूळ कंपनी, अल्फाबेटचे अग्रगण्य सीईओ म्हणून त्यांनी लॅरी पेज यांची जागा घेतली होती.

आपल्या या प्रगतीच्या मार्गात जर आपण वेगळी वाट निवडली असती तर आज कदाचित आई वडिलांना अभिमान वाटला असता असं पिचाई यांनी म्हटले आहे. पिचाई म्हणतात की, “मी शिक्षणापुरत्याच किंबहुना असं म्हणू पदवीपुरत्याच माझ्या मर्यादा ठेवल्या असत्या तर आज कदाचित माझ्याकडे पीएचडी असती, ज्यामुळे माझ्या पालकांना खरोखर अभिमान वाटला असता. परंतु तंत्रज्ञानाचे हे असंख्य फायदे इतर अनेकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मी गमावली असती”.

सुंदर पिचाई यांचा दिवसाचा पगार

आज, अल्फाबेटचे बाजारमूल्य १३८ लाख कोटींहून अधिक आहे. २०२२ मध्ये सुंदर पिचाई यांची नेटवर्थ USD २२६ दशलक्ष (अंदाजे रु. १,८५४ कोटी) इतकी होती,यानुसार आकडेमोड केल्यास त्यांनी दररोज ५ कोटी रुपये कमावले आहेत. कंपनीत काम करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्याच्या उत्पन्नापेक्षा हे ८०० पट जास्त होते.

हे ही वाचा<< मोबाईलचा फ्लॅश वापरून आईने बाळाला झालेला कॅन्सर ओळखला, काय होती लक्षणं, तुम्हीही काय काळजी घ्यावी?

यश टिकवायचं कसं?

इथे आणखी एक लक्षात घ्यायची बाब म्हणजे, एखाद्या पदावर पोहोचल्यावर सुद्धा ती व्यक्ती किती मेहनत घेते हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे. एका कार्यक्रमात सुंदर पिचाई यांनी सांगितले होते की ते त्यांचा प्रत्येक दिवस कामाच्या विषयी नवनवीन माहिती मिळवण्याने सुरु करतात. पिचाई म्हणाले की, ते सकाळी ६.३०- ७ च्या सुमारास उठतात आणि वॉल स्ट्रीट जर्नल आणि न्यूयॉर्क टाइम्सची ऑनलाइन आवृत्ती वाचतात. याशिवाय तंत्रज्ञानाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी ते ‘Techmeme’ या वेबसाईटला सुद्धा भेट देतात.