Indian Railways Give 20% Off On Return Tickets Under New Round Trip Package : सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गर्दी टाळण्यासाठी आणि तिकीट बुकिंग सोपे करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने एक नवीन योजना हाती घेतली आहे. राउंड ट्रिप पॅकेज, असे या योजनेचे नाव आहे. त्याअंतर्गत रिटर्न तिकीट बुक केल्यास प्रवाशांना २० टक्के सूट मिळणार आहे. ही योजना अॅडव्हान्स तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल. १४ ऑगस्टपासून ही योजना सुरू होणार आहे.
कोणाला मिळेल राउंड ट्रिप पॅकेज योजनेचा लाभ?
या योजनेचा लाभ फक्त त्या प्रवाशांनाच मिळेल, जे दिलेल्या मुदतीत रिटर्न तिकीट बुक करतात. प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे दोन्ही तिकिटांचे शुल्क समान असेल. त्याशिवाय परतीच्या प्रवासाचे बुकिंग जाण्याचे तिकीट बुक केल्यानंतर करावे लागेल. त्यासाठी आगाऊ तिकीट बुकिंगचा कोणताही नियम लागू होणार नाही.
काय नियम आहेत?
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी कन्फर्म तिकिटे असणे आवश्यक आहे. त्याशिवाय तिकिटे एकाच क्लास आणि एकाच स्थानकाची असावीत. दोन्ही तिकिटे ऑनलाइन किंवा काउंटरवरून बुक करावी लागतील; परंतु दोन्ही एकाच माध्यमातून बुक केलेली असावीत. म्हणजे पहिलं तिकीट काउंटरवरून बुक केलं असेल, तर दुसरही काऊंटरवरूनच बुक करावं लागेल. योजनेतील ही सूट वेटिंग किंवा आरएसी या तिकिटांना लागू नसेल.
या योजनेचा लाभ कधीपासून कधीपर्यंत घेता येईल?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जाण्याचे तिकीट १३ ते २६ ऑक्टोबरदरम्यानचे आणि रिटर्न तिकीट १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ दरम्यानचे असावे. कनेक्टिंग जर्नीचा पर्याय वापरून तिकीट बुक करावे लागेल.
कोणत्या गाड्यांमध्ये हा नियम लागू असेल?
ही योजना सर्व दर्जाच्या डब्यांना आणि सर्व रेल्वेगाड्यांमध्ये (विशेष गाड्यांसह) लागू असेल. पण, ही योजना फ्लेक्सी फेअर असलेल्या गाड्यांमध्ये लागू होणार नाही.
तुम्हाला काय मिळणार नाही?
१) प्रवासात कोणताही बदल झाल्यास रिफंड म्हणजे पैसे परत मिळणार नाहीत.
२) तिकिटात कोणतेही बदल किंवा सुधारणा करता येणार नाहीत.
३) या योजनेत डिस्काउंट पास, कूपन, पीटीओ इत्यादी वैध राहणार नाही.