Lalit Patidar Hairiest Face: माणसाच्या चेहऱ्याची ठेवण एका विशिष्ट पद्धतीत आहे. पुरूषांच्या चेहऱ्यावर मिशी, दाढी आढळून येते. पण कधी कधी काही विशिष्ट आजारांमुळे या सामान्य परिस्थितीत अभूतपूर्व असे विचित्र बदल दिसून येतात. असेच बदल मध्य प्रदेशच्या १८ वर्षीय तरुणाच्या आयुष्यात आले. ललित पाटीदार या तरुणाचा संपूर्ण चेहरा केसांनी व्यापलेला आहे. या तरूणाला ‘वेअरवुल्फ सिंड्रोम’ नावाचा दुर्मिळ आजार असल्याचे काही वर्षांपूर्वी समजले होते. वयाच्या सहाव्या वर्षी ‘हायपरट्रिकोसिस’ ही परिस्थिती उद्भवल्यामुळे ललित पाटीदारचा चेहरा केसाळ झाला. या अवस्थेमुळे ललितचे वैयक्तिक आयुष्य खडतर झालेच. पण त्याशिवाय त्याला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त झाली आहे. चेहऱ्यावर सर्वाधिक केस असल्याकारणाने त्याची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये झाली आहे.

अशी विचित्र परिस्थिती असलेल्या केवळ ५० व्यक्तींची नोंद आजवर झालेली आहे. ‘हायपरट्रिकोसिस’ मुळे संपूर्ण शरीरावर केसांची अतिरिक्त वाढ होते. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डनुसार ललित पाटीदारचा ९५ टक्के चेहरा केसांनी व्यापला आहे. चेहऱ्यावर प्रति स्क्वेअर सेंटिमीटर भागात २०१.७२ इतके केस आहेत.

पण वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली असली तरी ललित पाटीदारचा आजवरचा प्रवास सोपा नाही. वर्गमित्र, रस्त्यावरील अनोखळी लोक यांच्याकडून त्याला अनेकदा हेटाळणी सहन करावी लागली आहे. अनेक लोक त्याला बघून घाबरतात.

“अनेक लोक पहिल्यांदा मला पाहतात, तेव्हा घाबरतात. पण जशी जशी त्यांच्याशी ओळख वाढते. तेव्हा ते माझे वेगळेपण समजून घेतात. मी बाह्यरुपाने जरी वेगळा दिसत असलो तरी माझे अंतरंग हे इतर मुलांप्रमाणेच आहेत, हेही लोकांना समजते”, अशी प्रतिक्रिया ललित पाटीदारने दिली.

लोकांच्या हेटाळणीला ललित फारसे मनावर घेत नाही. कारण हेच त्याचे जीवन असल्याचे त्याने स्वीकारले आहे. ललित एक युट्यूब चॅनेलही चालवत आहे. यावर तो त्याच्या दैनंदिनीचे व्लॉग्स अपलोड करत असतो. युट्यूबवर त्याचे एक लाखाहून अधिक सबस्क्राइबर आहेत. तर इन्स्टाग्रामवर अडीच लाखांहून अधिक लोक त्याला फॉलो करतात. ललितने अलीकडेच इटलीतील मिलान शहराला भेट दिली होती. येथील एका टीव्ही शोमध्ये त्याच्या चेहऱ्यावरील केसांची अधिकृत मोजणी करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर ललितने सांगितले, “हा सन्मान मिळाल्यानंतर मी अवाक झालो आहे. मला जागतिक पातळीवर मान्यता मिळाल्यामुळे खूप आनंद वाटतो आहे. ज्यांनी मला माझ्या चेहऱ्यावरील केस कापण्याचा सल्ला दिला होता, त्यांना आता मी फार काही बोलू इच्छित नाही. मी जसा आहे, तसा चांगला आहे आणि मी ते स्वीकारले आहे. मला बदल करायचा नाही, हे मी त्यांना आता ठामपणे सांगू शकतो.”