रामनाथ कोविंद हे देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून विराजमान होणार आहेत. लवकरच ते राष्ट्रपती भवनात वास्तव्यास जाणार आहेत तेव्हा हे राष्ट्रपती भवन कसे आहे याची उत्सुकता तुम्हालाही असेल. सुमारे १३० हेक्टर परिसरात ही आलिशान वास्तू उभी आहे. १९१२ मध्ये ब्रिटीशांच्या काळात ही वास्तू बांधायला सुरूवात झाली. १९ वर्षांच्या बांधकामानंतर १९३१ साली ही इमारत उभी राहिली, त्यावेळी राष्ट्रपती भवन हे ‘व्हाइस रिगल लॉज’ नावाने ओळखले जात होते, स्वांतत्र्यानंतर या वास्तूचे रूपांतर राष्ट्रपती भवनात होऊन ते राष्ट्रपतींच्या निवासाबरोबर त्यांच्या कार्यालयासाठीही ओळखले जाऊ लागले.

– ‘सर एडविन लचिन्स’ या प्रख्यात वास्तुविशारदाने या इमारतीचा आराखडा तयार केला. एडविन हे सर विन्स्टन चर्चिल यांना चित्रकला शिकवायचे. इंग्लडमध्ये अनेक अमीर, उमराव, सरदारांच्या इमारती त्यांनी बांधल्या होत्या. तसेच चर्च आणि उद्यानांचे आराखडेही तयार केले होते. तेव्हा राष्ट्रपती भवनासाराखी सुंदर वास्तू तयार करण्याचे श्रेय एडविन यांचेही आहे.
– राष्ट्रपती भवनात ३६५ खोल्या आहेत. त्यातल्या ६५ खोल्या मोठय़ा आकाराच्या आहेत.
– या इमारतीच्या उभारणीसाठी एकूण २२७ खांब असून अनेक कमानीच आहेत. यामुळे प्रखर सूर्यप्रकाश आणि पाऊस पाण्यापासून इमारतीचे रक्षण होते. इमारतीच्या बांधकामात विटा आणि दगडांचा जास्त उपयोग केला असून लोखंडाचा उपयोग कमीत कमी करण्यात आलाय. या वास्तूच्या बांधकामासाठी २९ हजारांहून अधिक कामगारांनी श्रमदान केल्याचंही म्हटले जाते.

– राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल हा सगळ्यात प्रसिद्ध होता. नवनिर्वाचित राष्ट्रपती याच दरबार हॉलमध्ये आपल्या पदाची, गोपनीयतेची शपथ घेतात. इथल्या संगमरवरी भिंती आणि झुंबर हे अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते.
– राष्ट्रपती भवनातील एक शाही दिवाणखाना म्हणजे ‘अशोका हॉल’ होय. येथे पंतप्रधान, इतर मंत्री यांचा शपथविधी या सभागृहात पार पडत असतो. परदेशी राजदूत, उच्चायुक्त आपली ओळख तथा अधिकारपत्रे राष्ट्रपतींना याच सभागृहात सादर करतात.-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनही जगप्रसिद्ध आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हे गार्डन पर्यटकांसाठी खुले केले जाते. ते पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. जगभरातल्या अनेक दुर्मिळ प्रजातीची फुल झाडे, औषधी वनस्पती इथे पाहायला मिळतात.