डॉक्टरकीच्या व्यवसायात एखाद्याने पाऊल टाकलं की समोरच्या व्यक्तीचे प्राण वाचवणे हे त्याचे पहिले कर्तव्य बनवते आणि विद्यार्थीदशेतच नागपूरच्या एका MBBS च्या विद्यार्थ्याला याची जाण झाली. २४ वर्षांचा विपीन खडसे अहमदाबाद पुरी एक्सप्रेसने प्रवास करत होता. यावेळी याच ट्रेनने प्रवास करणा-या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या पण ट्रेनमध्ये कोणतीही मदत मिळेना. शेवटी नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला शिकणारा विपीन देवदूतासारखाच मदतीला धावून गेला आणि त्याने या महिलेची प्रसूती केली.
आपल्या आयुष्यातील सगळ्यात आठवणीत राहिलेला अनुभव असल्याची माहिती त्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिली. अहमदाबाद एक्सप्रेसने प्रवास करताना एका महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्याचे त्याला कळले. टीसी संपूर्ण बोगीमध्ये कोणी डॉक्टर असल्याची विचारपूस करत होता. आपण विद्यार्थी असल्याने त्याला प्रतिसाद दिला नाही पण दुस-यावेळी देखील मदत न मिळाल्याने तो परत आला तेव्हा मदत करण्याचे ठरवले असेही त्याने सांगितले. विपीन जेव्हा या महिलेजवळ पोहोचला तेव्हा या महिलेची परिस्थिती चिंताजनक होती. पण त्यातूनही तिची प्रसुती करणे आवश्यक होते म्हणूनच विपीनने आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर असलेल्या डॉक्टरांची मदत घेत यशस्वीपणे तिची प्रसुती केली. काही महिला प्रवशांनीही यावेळी त्याला मदत केली, म्हणून एक नवजात बालक सुखरूप या जगात येऊ शकले. नंतर नागपूर स्टेशनवर डॉक्टरांची टीम पोहोचून त्यांनी परिस्थितीचा ताबा घेतला. एका बाळाला जीवनदान दिल्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यामातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.