Reddit Post Of Young Employee: अलिकडच्या वर्षांत भारतातील आयटी क्षेत्रातील वर्क कल्चरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत. कर्मचारी बर्नआउट, असमान वेतन आणि अपूर्ण आश्वासनांबद्दल खुलेपणाने बोलू लागले आहेत. अशात, रेडिटवर एका तरुणाने बॉस, पगार, कामाचा ताण आणि आश्वासने पूर्ण न करणाऱ्या व्यवस्थापकावर भाष्य केले आहे.

तरुणाच्या पोस्टनुसार, त्याने २०२१ मध्ये १३ लाख रुपयांच्या वार्षिक पगारासह एका कंपनीत नोकरी सुरू केली. नोकरी सुरू केल्यानंतर लगेचच रोज त्याच्यासमोर नवी-नवी आव्हाने निर्माण होऊ लागली. सकाळी ११ ते रात्री ८ हे अधिकृत कामाचे तास असूनही, त्याला नियमितपणे रात्री उशिरापर्यंत, कित्येकदा पहाटे १ वाजेपर्यंत काम करावे लागत असे.

“दोन ते तीन वर्षे प्रामाणिक केल्यानंतर…”

“दोन ते तीन वर्षे प्रामाणिक केल्यानंतर, मी माझ्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला आणि रात्री उशिरापर्यंत चालणारे काम अखेर इतरांना देण्यात आले”, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. यामुळे तरुणाला काही प्रमाणात दिलासा मिळाला, तरीही त्याचे काही प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.

सहकाऱ्यांना १३ ते १५ टक्के पगारवाढ

चार वर्षांचा अनुभव असलेल्या या तरुणाला आणखी एका कठोर वास्तवाचा सामना करावा लागला. व्यवस्थापकाने प्रमोशनबाबत तोंडी आश्वासन दिले, तरी पगार फक्त १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. दरम्यान, त्याच्याइतकाच अनुभव असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांना सुमारे १८ लाख वार्षिक पगार मिळत आहे. कंपनीने त्याला समाधानकारक पगारवाढ दिली नाही, मात्र इतर सहकाऱ्यांना १३ ते १५ टक्क्यांची पगारवाढ दिली. यामुळे हा तरुण अधिकच हतबल झाला आहे.

“कधीही विश्वास ठेवू नका”

दरम्यान, सोशल मीडियावर या पोस्टवर असंख्य प्रतिक्रिया उमटल्या आहेत. प्रतिक्रिया देताना एक युजर म्हणाला, “तुम्ही कितीही काम केले, तरी कंपनीला ते पुरेसे वाटणार नाही. तुमच्या वेळेचा आदर करा आणि ओव्हरटाईम टाळा. तुमच्या कारकिर्दीत तुम्ही चांगले मित्र बनवाल, पण वेळ तुम्हाला चांगले मित्र कसे शोधायचे ते शिकवेल. नियमानुसार, व्यवस्थापनातील कोणावरही कधीही विश्वास ठेवू नका, जोपर्यंत ते लिखित स्वरूपात देत नाहीत.”