Indore Girl Weds Another: शाहीद कपूर आणि करीना कपूर यांचा १८ वर्षांपूर्वी आलेला ‘जब वी मेट’ सिनेमा आजही अनेकांच्या लक्षात आहे. प्रियकराशी लग्न करण्यासाठी करीना कपूरनं घर सोडलं होतं, मात्र तिचा प्रियकर ऐनवेळी तिची साथ साडतो. त्यानंतर ती ट्रेनमध्ये भेटलेल्या शाहीद कपूरशी लग्न करते, अशी चित्रपटाची कथा होती. अशाच प्रकारची एक घटना आता मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये घडली आहे. २३ ऑगस्ट रोजी २२ वर्षीय बीबीएची विद्यार्थींनी घरातून बेपत्ता झाली होती. प्रियकराबरोबर लग्न करण्यासाठी ती पळून गेली असल्याचं सांगितलं गेलं. मात्र आता ती दुसऱ्याच मुलाबरोबर लग्न करून समोर आल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी सांगितले की, २२ वर्षीय तरूणी तिचा प्रियकर सार्थकबरोबर पळून जाण्याच्या विचारात होती. यासाठी तिने योजनाही आखली होती. ठरलेल्या वेळेनुसार ती रेल्वे स्थानकावर पोहोचली. मात्र सार्थक त्याठिकाणी आला नाही. त्यामुळे ती ठरल्याप्रमाणे रतलामला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढली. त्यानंतर तिचा मित्र करणदीपशी तिचा संपर्क झाला. करणदीप इंदूरच्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो.
तरूणीने सांगितले की, जेव्हा ती रतलामच्या ट्रेनमध्ये बसली. तेव्हा करणदीपही त्याच ट्रेनने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान दोघांची चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. तरूणीने पोलिसांना सांगितले की, दोघांनी मंदसौर येथे उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिथून २५० किमी दूर असलेल्या महेश्वर-मंडलेश्वर जाण्याचा निर्णय घेतला.
महेश्वर-मंडलेश्वर येथे लग्न केल्यानंतर सदर जोडपे इंदूरला परतले. तिथे तरूणीने थेट पोलीस ठाणे गाठून सर्व काही माहिती दिली. मात्र तरूणीच्या दाव्यावर पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे लग्नाचा पुरावा मागितला. चौकशीत सार्थकने सांगितले की, तो गेल्या अनेक दिवसांपासून प्रेयसीच्या संपर्कात नव्हता.
तरूणीच्या वडिलांना मात्र या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. माझ्या मुलीच्या निर्णयामुळे मला धक्का बसला आहे. मी तिचा हा निर्णय मान्य करत नाही. घरी परत येण्यासाठी मी तिला पैसे पाठवले होते, मात्र तरीही तिने करणदीपबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी म्हटले की, तरूणी प्रौढ असून तिला कायद्याने आवडीच्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी तरूणीला वडिलांच्या ताब्यात देण्यास असमर्थतता दर्शवली. मात्र सदर जोडप्याची चौकशी सुरू आहे.