Jeff Bezos and Lauren Sanchez wedding : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसर्या क्रमांकावर असलेला व्यक्ती जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो सोहळा कोणाच्याही नजरेत न येता शांततेत पार पडेल याची शक्यता फार कमी असते. अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस आणि त्यांची होणारी पत्नी लॉरेन सांचेझ इटलीतील व्हेनिस येथे तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्यात लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या लग्न सोहळ्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होताना दिसत आहे. या लग्न सोहळ्याबद्दल आता आणखी माहिती समोर आली आहे.
बेझोस (६१) आणि सांचेझ (५१) या दोघांची यापूर्वी लग्ने झालेली आहेत. बेझोस यांचे मॅकेन्झी स्कॉट बरोबर लग्न झाले होते आणि त्यांना चार मुले देखील आहेत. तर सांचेझ यांनी २००५ मध्ये टॅलेंट एजंट पेट्रिक व्हाईटसेल यांच्याशी लग्न केले होते, तर २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, या दोघांना दोन मुले देखील आहेत. इतकेच नाही तर त्यांना माजी एनएफएल खेळाडू टोनी गोंझालेझ यांच्याबरोबर नात्यात असतानाच एक मुलगा देखील आहे.
बेझोस यांचं लग्न २४ जून ते २६ जून या काळात होणार आहे अशी माहिती व्हेनिसच्या महापौरांच्या प्रवक्त्याने याबद्दल सीएनएनशी बोलताना माहिती दिली आहे. या सोहळ्याला २०० हाय-प्रोफाइल पाहुणे येणे अपेक्षित आहे आणि हा सोहळा सॅन जॉर्जिओ मॅगिओर (San Giorgio Maggiore) या बेटावर होणार आहे.
निमंत्रितांच्या यादीत कोण कोण आहे?
या लग्न सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलेल्या पाहुण्यांची यादी अद्याप गुलदस्त्यात असली तरी यासाठी जगातील कानाकोपऱ्यातील सेलिब्रिटी, उद्योजक, राजकारणी यांची उपस्थिती अपेक्षित आहे. आमंत्रितांच्या यादीत ब्रिटिश अभिनेता ऑरलँडो ब्लूम आणि केटी पेरी, मिक जॅगर, किम कार्दाशियन, क्रिस जेनर, ओप्रा विन्फ्रे, इवा लोंगोरिया आणि लिओनार्डो डिकॅप्रियो यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. याबरोबर उद्योजक बिल गेट्स, एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग हे देखील हजर राहतील अशीही चर्चा आहे.
लग्नाचा अपेक्षित खर्च किती असेल?
टेलिग्राफने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, संपूर्ण लग्नाचा खर्च अंदाज १६ दशलक्ष डॉलर्स (१३८ कोटी) पर्यंत जाऊ शकतो. ज्यापैकी फुलांच्या सजावटीसाठी आणि लग्न सोहळा होणार त्या ठिकाणाच्या सजावटीसाठी १ दशलक्ष डॉलर्स, वेडिंग प्लॅनिंग सर्व्हिसेससाठी ३ दशलक्ष डॉलर, ऐतिहासिक स्थळांचे भाडे म्हणून २ दशलक्ष डॉलर, केटरिंगसाठी १ दशलक्ष डॉलर्स आणि सांतेझ यांच्या तीन दिवसांच्या कपड्यांसाठी १.५ दशलक्ष डॉलर्सच्या खर्चाच समावेश असल्याचे सांगितले जात आहे.