Viral video: साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. सध्या असाच एक जंगलातला एका अजगराचा थरारक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही सुन्न व्हाल.

आतापर्यंत तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये एखाद्या महाकाय अजगराने एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला जिवंत गिळल्याची दृष्यं पाहिली असतील. खास करुन हॉलिवूड चित्रपटांमध्ये असली दृष्यं अनेकदा दाखवली जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका धक्कादायक घटनेत, गावकऱ्यांनी एका महाकाय अजगराची निर्घृणपणे हत्या केल्याचे वृत्त आहे. एका शेतकऱ्याच्या शेळीला अजगरापासून वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी त्या महाकाय सापाला मारले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये गावकरी मृत शेळी आणि अजगराला रस्त्यावर ओढताना दिसत आहेत.

रकासा पोलीस स्टेशन हद्दीतील पुनावली गावात ही घटना घडल्याचे वृत्त आहे. सुमारे १५ ते २० फूट लांबीच्या या महाकाय अजगराने शेतात असलेल्या शेळीवर हल्ला करून गिळंकृत केले. मुकुंडी राजपूर येथील जसवंत राजपूत (३५) हा मुलगा राजघाट कालव्याजवळील शेतात त्याच्या शेळ्या आणि इतर गुरे चरत होता. हा परिसर झाडांनी व्यापलेला आहे जिथे जनावरे चारत होती, यावेळी अचानक गवतातून एक मोठा अजगर आला आणि त्याने शेळीवर हल्ला केला. त्याने एका शेळीला धरले आणि हळूहळू गिळू लागला. शेळीवर महाकाय सापाने हल्ला केला तेव्हा त्या शेळीने मोठा आवाज केला. यावेळी शेळीचा मोठा आवाज ऐकून जसवंत घटनास्थळी धावला. महाकाय अजगर त्या प्राण्याभोवती गुंडाळून त्याला गिळण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून तो आश्चर्यचकित आणि भयभीत झाला. जसवंतचा ओरड ऐकून इतर गावकरीही घटनास्थळी पोहोचले. शेळीला अजगरापासून वाचवण्यासाठी इतर शेतकरी काठ्या, रॉड आणि कुऱ्हाडी घेऊन घटनास्थळी पोहोचले.

व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, गावकऱ्यांनी शेळीला वाचवण्यासाठी अजगरावर कुऱ्हाडीने हल्ला केला. मात्र एवढ्या प्रयत्नांनंतरही ते शेळीला वाचवू शकले नाहीत. तर दुसरीकजे कुऱ्हाडीने हल्ला झाल्याने अजगरही जागीच ठार झाला.त्यानंतर गावकऱ्यांनी शेळी आणि सापाला ओढत रस्त्यावर आणले. व्हिडिओमध्ये गावकऱ्यांपैकी एक काळ्या शेळीचा मृतदेह घेऊन जात असल्याचे दिसत आहे आणि दुसरा मृत सापाला लांब काठीने ओढताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

परिसरात घबराट

अचानक एका महाकाय सापाला पाहून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत त्यांनी त्यांच्या महिला आणि मुलांना शेतात किंवा कालव्याजवळ जाऊ नये असे आवाहन केले आहे. दरम्यान गावकऱ्यांनी सापाचे प्राण वाचवायला हवे होते आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना वाचवण्यासाठी वन विभागाला फोन करायला हवा होता. मानवांनी प्राण्यांसोबत सुसंवाद साधून, निसर्गातील त्यांच्या स्थानाचा आदर करून एकत्र राहण्यास शिकले पाहिजे.