Jitendra Awhad Comments On Supriya Sule Viral Video: निवडणुकीच्या काळात नेत्यांचे अनेक आरोप-प्रत्यारोपाचे व्हिडीओ व्हायरल होतात. अशाच एका व्हिडीओमध्ये जितेंद्र आव्हाड “८६ वर्षांच्या वडिलांना म्हणाव लागत आहे की, माझ्या ५० वर्षांच्या तरुण मुलाला तुम्ही सांभाळून घ्या. हे मागच्या पिढीचे अपयश आहे.” असं म्हणत असल्याचं दिसत आहे. व्हायरल व्हिडीओसह केल्या जाणाऱ्या दाव्यानुसार, जितेंद्र आव्हाड व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळेंना उद्देशून बोलत आहेत अशी चर्चा रंगली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीअंती या व्हिडीओचा मूळ संबंध शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंशी सुद्धा असल्याचे दिसत आहे. नेमकं हे प्रकरण काय, चला जाणून घेऊया.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडीओमध्ये जितेंद्र आव्हाड आयबीएन लोकमतशी बोलताना म्हणतात की, “इतिहास कुणी स्वता:च्या हाताने पुढे नेत नाही. तो नेण्यासाठी एक पिढी जन्म घ्यावी लागते. खरंतर राजकीय इतिहासाचा वारसा हा पिढ्यान पिढ्या विचारांनी नेला जातो. या ठिकाणी मला दुर्दैवाने दिसत आहे की, ८६ वर्षांच्या वडिलांना म्हणावं लागत आहे की, ‘माझ्या 50 वर्षांच्या तरुण मुलाला तुम्ही सांभाळून घ्या. हेच मागच्या पिढीचे अपयश आहे.”

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये अनेकांनी लिहिले की, “अखेर आव्हाडांनाच सुप्रियाताईंना सुनवावे लागले.”

तपास:

कीवर्ड सर्च केल्यावर आमच्या हे लक्षात आले की, व्हायरल क्लिपमधील वक्तव्य आव्हाडांनीच केलं असलं तरी ते ११ वर्षांपूर्वी केले होते.जितेंद्र आव्हाड यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर या संपूर्ण चर्चेचा व्हिडिओ १९ फेब्रुवारी २०१३ रोजी अपलोड केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे भवितव्य काय?”

या चर्चेमध्ये पत्रकार निखील वागळे, तत्कालिन शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला होता. जितेंद्र आव्हाड ९ मिनिट ३ सेकंदांपासून पुढे म्हणतात की, “इतिहास आणि वर्तमानाची सांगड घालताना, इतिहास कुणी स्वता:च्या हाताने पुढे नेत नाही. तो नेण्यासाठी एक पिढी जन्म घ्यावी लागते. खास करून राजकीय इतिहासाचा वारसा हा पिढ्यान पिढ्या विचारांनी नेला जातो.”

पुढे ते सांगतात की, “मला दुर्दैवाने इतकंच दिसतंय की, इंजेक्शन देण्यासाठी दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंना तलवार काढावी लागते हे मागच्या पिढीचे अपयश आहे. या वयामध्ये तरूणांनी आपल्या आपल्या माता-पित्याचा वारसा पुढे नेत असताना आपले संस्कार, ताकद, धिरोदत्तपणाचं दर्शन करून द्यायचं असतं. असं जेव्हा घडत नाही, तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना याचकासारखं बोलावं लागतं की, माझ्या मुलांना संभाळा. ८६ वर्षांच्या वडिलांना ५० वर्षांच्या तरूणाला तुम्ही सांभाळून घ्या, असे सांगावे लागत असेल तर हे मला महाराष्ट्रच्या दृष्टीने दुर्दैव आहे असे वाटते.”

हे वक्तव्य आपण येथे पाहू शकता.

या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली नाही.

हे ही वाचा<< “राजा नग्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने..”, नरेंद्र मोदींवर जगप्रसिद्ध वृत्तपत्राची गंभीर टीका? ऑनलाईन वादंग सुरु, खरे मुद्दे पाहा

खालील तुलनात्मक व्हिडीओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून बाळासाहेबांचा उल्लेख हटविण्यात आला आहे.

निष्कर्ष: यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडीओ एडिटेड आहे. हा व्हिडीओ २०१३ सालचा असून यामध्ये जितेंद्र आव्हाड शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोलत होते. खोट्या दाव्यासह एडिटेड व्हिडीओ व्हायरल होत आहे.

टीप: ही कथा फॅक्टक्रेसेंडॉने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ता ने पुनर्प्रकाशित केली आहे.

अनुवाद: अंकिता देशकर