नोटाबंदीवरुन सोशल मीडियावर विरोधक केंद्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ट्विटवरवरुन सरकारवर तिखट शब्दात टीका करण्यात आघाडीवर असतात. मात्र सोमवारी ट्विटरवर केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्यावर टीका करण्याच्या नादात चुकीची माहिती ट्विट केली आणि केजरीवाल यांची खिल्ली उडवण्याची आयती संधीच ट्विटरकरांना मिळाली.
नोटाबंदीच्या निर्णयाचा लग्नसराईच्या हंगामाला फटका बसला. लग्नाच्या तयारीसाठी आता पैसे कुठून आणायचे असा प्रश्न अनेकांना पडला. काही जणांना लग्न पुढे ढकलावे लागले. लग्नसराईच्या मोसमात नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी होती. अखेर सरकारने याची दखल घेतली आणि लग्नपत्रिका दाखवून बँकेतून अडीच लाख रुपये काढण्याची मुभा सरकारने दिली. सरकारच्या या निर्णयावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सरकारवर उपरोधिक टीका करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांच्या मुलाचे लग्न आहे. यावरुन निशाणा साधताना केजरीवाल यांनी ट्विट केले. पण यात त्यांनी शर्मा यांच्या मुलाऐवजी मुलीचे लग्न असल्याचे म्हटले. ‘भाजप खासदार महेश शर्मा यांच्या मुलीचे लग्न आहे. आता ते सगळे व्यवहार चेकने करत आहे का ? अडीच लाखात लग्न होणार का ? त्यांच्या नोटा कशा बदलल्या गेल्या ?’ अशा स्वरुपाचे ट्विट त्यांनी केले. मात्र केजरीवाल यांची ही चुक महेश शर्मा यांनी तातडीने निदर्शनास आणून दिली. शर्मा म्हणाले, ‘माझ्या मुलीचे नव्हे तर मुलाचे लग्न आहे. मी सगळे व्यवहार चेकने करतोय’.
भाजपा सांसद महेश शर्मा की बेटी की शादी है। क्या सारी चेक से पेमेंट कर रहे हैं? क्या ढाई लाख रुपए में शादी कर रहे हैं? उनके नोट कैसे बदले गए?
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 28, 2016
अपनी जानकारी सही करिये। मेरे बेटे की शादी है। जी हाँ, सभी पेमेंट बैंक के माध्यम से की जा रही है। https://t.co/zXsr2ikMXb
— Dr. Mahesh Sharma (@dr_maheshsharma) November 28, 2016
केजरीवाल आणि शर्मा यांच्यातील या ट्विटयुद्धाची ट्विटरकरांनीही लगेच दखल घेतली. अनेकांनी केजरीवाल यांची खिल्ली उडवली. केजरीवाल यांची लग्नासाठी लोकपाल म्हणून नियुक्ती करावी इथपासून ते केजरीवाल यांनी आत्तापर्यंत सोशल मीडियावर दिलेल्या चुकीच्या माहितीची दाखले देत त्यांची खिल्ली उडवण्यात आली.
गेल्या आठवडाभरात केजरीवाल यांनी ट्विटरवर चुकीची माहिती दिल्याची ही दुसरी वेळ आहे. मध्यप्रदेशमध्ये एका तरुणाने बँकेत आत्महत्या केल्याचे फोटो केजरीवाल यांनी ट्विट केले होते. नोटाबंदीमुळे या तरुणाने आत्महत्या केल्याचे केजरीवालांचे म्हणणे होते. मात्र तपासाअंती या तरुणाने बँकेत चोरीचा प्रयत्न केला. पण प्रयत्न फसल्यावर त्याने बँकेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. यावरुनही केजरीवाल टीकेचे लक्ष्य ठरले होते. आता पुन्हा एकदा चुकीची माहिती ट्विट केल्याने केजरीवाल हेच टीकेचे लक्ष्य ठरले आहेत.