आंतरराष्ट्रीय न्यायालयात चीनने पाकिस्तानला धक्का दिला आहे. कुलभूषण जाधव प्रकरणात चीनच्या न्यायाधीशांनीही भारताच्या बाजूने मत दिलं. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्या. अब्दुलक्वी अहमद युसूफ यांच्या अध्यक्षतेखालील 16 सदस्यीय पीठाने या प्रकरणात भारताच्या बाजूने स्पष्ट बहुमत दिलं. यात चीनचे न्यायाधीश हनकीन यांनीही बहुमताच्या बाजूने म्हणजेच पाकिस्तानविरोधात कौल दिला. 15-1 अशा मोठ्या फरकाने भारताच्या बाजूने निकाल देण्यात आला. अवघं एक मत पाकिस्तानच्या बाजूने पडलं. हे मत देखील न्यायवृंदातील पाकिस्तानच्या सदस्यानेच केलं. न्या. टी. एच. जिलानी यांनी पाकिस्तानच्या बाजूने मत केलं अर्थात पाकिस्ताननेच स्वतःच्या बाजूने मत दिलं. विशेष म्हणजे चीनने पाकिस्तानविरोधात मत दिल्याने पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. पाकिस्तानी माध्यामांमध्येही यावरुन विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. हा भारतासाठी मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढील कार्यवाही ‘कायद्या’प्रमाणेच : पाकिस्तान

कुलभूषण जाधव प्रकरणात ‘कायद्याप्रमाणे’ पुढील प्रक्रिया पार पाडण्यात येईल, असे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट केले. पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय समुदायाचा जबाबदार सदस्य आहे. पाकिस्तानने या प्रकरणात न्यायालयीन सुनावणीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यापासूनच आपली कटिबद्धता जोपासली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

भारताकडून स्वागत-

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले. हा भारताचा मोठा विजय असून, या निर्णयाने भारताच्या भूमिकेला बळकटी मिळाली आहे. कुलभूषण यांची लवकरच सुटका होऊन त्यांना भारतात परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाची पाकिस्तानने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षाही परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली.

मित्र, नातेवाईकांमध्ये आनंद अन् भीतीही-

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरात आनंद व्यक्त करण्यात येत असून, कुलभूषण जाधव यांच्या मुंबईतील मित्रांनी पेढे वाटून, फुगे हवेत सोडत जल्लोष केला. या प्रकरणात पाकिस्तान तोंडघशी पडले असून, आता कुलभूषण यांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी मागणी त्यांचे बालपणीचे मित्र अरविंद सिंग यांनी केली. न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, पाकिस्तान त्याची अंमलबजावणी करेल का, अशी भीतीही त्यांच्या अनेक मित्रांनी व्यक्त केली. ‘या प्रकरणात भारत सरकार करत असलेल्या परिश्रमाबद्दल आम्हाला आनंद आहे. मात्र, कुलभूषण यांना पाकिस्तानमधून भारतात आणले जाईपर्यंत भीती कायम राहील’’, असे कुलभूषण यांचे नातेवाईक निवृत्त एसीपी सुभाष जाधव यांनी सांगितले.

निकालाची वैशिष्टय़े-

* कुलभूषण यांच्याशी राजनैतिक संपर्काच्या भारताच्या अधिकाराचे पाकिस्तानकडून उल्लंघन झाल्याचा न्यायालयाचा ठपका

* न्यायालयाचा १५ विरुद्ध १ असा निर्णय. न्यायवृंदातील पाकिस्तानच्या सदस्याचे बहुमताच्या निर्णयाविरोधात मत

* व्हिएन्ना करारानुसार, कुलभूषण यांच्या अटकेबाबत भारताला तात्काळ माहिती देणे पाकिस्तानला बंधनकारक होते. मात्र ही माहिती देण्यात तीन आठवडय़ांचा विलंब होणे हे पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन, असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kulbhushan jadhav verdict only pakistan votes against india sas
First published on: 18-07-2019 at 11:02 IST