Lalbaug cha raja 2025: शहरात गणेशोत्सवाची सुरवात होते ती लालबागच्या राजाच्या दर्शनाने. यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरूपती बालाजीच्या राज मुकुटात बसवण्यात आला आहे. त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे.लालबागचा गणेशोत्सव संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. देशभरातून अनेक भाविक लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. त्यामुळे लालबागमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या मंडपात बाचाबाची, राडा, अरेरावी, धक्काबुक्की, दमदाटी असे प्रकार काही नवे नाहीत. यापूर्वीही अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहे. अशातच आता लालबागच्या राजाची पहिली झलक पाहण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याचाच भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबईतील लालबाग हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. या मुंबईने आपल्याला स्वप्नं पाहायला शिकवलं, मेहनत करायला शिकवलं; पण याच मुंबईनं स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम करण्याचीही सवय लावली. पण, हीच सवय आता नको तिथेदेखील बघायला मिळत आहे. मुंबईच्या लालबाग परिसरातला एक चित्तथरारक असा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओतली गर्दी आणि भाविकांचा बेशिस्तपणा पाहिला, तर अंगावर शहारे येतील. त्यामुळे या वस्तुस्थितीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. एकीकडे मंडळाचे कार्यकर्ते दोन महिन्यांपासून सगळं नियोजन करीत असतात. लाखोंची गर्दी सांभाळत असतात. अशा वेळी त्यांना सहकार्य करणं भाविकांचं काम आहे. मात्र, या ठिकाणी भाविकांनी कार्यकर्ते आणि पोलिसांचं काहीही ऐकलं नाही.

रविवारी लालबागच्या राजाचं प्रथन दर्शन झालं यावेळी फोटो काढण्यासाठी बेशीस्तपणे तरुणाई आली आणि त्यानंतर अशाप्रकारे भयंकर परिस्थिती निर्माण झाली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गणेशोत्सव सुरु होण्याआधीच लालबागच्या राजाच्या मंडपात ही परिस्थिती आहे. यामध्ये काही तरुण गर्दीत खाली पडल्याचंही दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ anokhi_mumbai नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.