Lalbaugcha Raja Old video: नवसाला पावणारा गणपती, अशी मुंबईतील लालबागच्या राजाची ओळख आहे. त्यामुळेच मुंबई आणि मुंबईबाहेरूनदेखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागच्या राजाला पाहायला भाविक गर्दी करीत आहेत. काही वेळा तर मंडळांतील कार्यकर्त्यांसोबत भाविकांची हाणामारीसुद्धा होते. असे कितीतरी व्हिडीओ दरवर्षी व्हायरल होतात. मात्र एक काळ असाही होता जेव्हा भाविकांना बाप्पाचं दर्शन थेट मिळत होतं. ना गर्दी, ना गोंधळ, ना व्हीआयपी रांगा… थेट मंडपात जा आणि बाप्पाच्या चरणांना स्पर्श करा. विश्वास बसत नाहीये, तर मग हा ३० वर्षे जुना व्हिडीओ पाहा. हा व्हिडीओ पाहून तुमचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

मुंबईतील लालबाग हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. दरवर्षी लालबागचा राजाच्या दर्शनासाठी लाखोंनी भाविक येतात, दोन-दोन दिवस रांगेत उभे राहतात. यानंतरही भाविकांना कार्यकर्ते अक्षरश: ढकलून बाहेर काढतात, दोन मिनिंट व्यवस्थित दर्शनही भाविकांना घेता येत नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, त्यावेळी लालबागच्या राजाला पाहण्यासाठी आजच्या इतकी गर्दी नसायची. कुठलाही गोंधळ नसायचा. व्हीआयपी रांगा नसायच्या. मात्र आज हे चित्र अगदी उलट आहे. व्हिआयपी रांगा, राजकीय नेत्यांना, कलाकारांना कोणत्याही रांगेशिवाय दर्शन तसेच कार्यकर्त्यांची आरेरावी हे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. अशातच हा जुना व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल जुनं ते सोनं.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ @RetweetMarathi या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ १ लाख ७२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हे दृश्य १९९६ सालचं आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर टीका करत प्रतिक्रिया दिली आहे. एकानं म्हंटलंय, “खरंय अगदी, सणांचा इव्हेंट केलाय आपण”

“जेव्हा पासून नवसाला पावणारा म्हणून मार्केटिंग झालं तेव्हा पासून गर्दी, आणि कलेक्शन वाढलं.”

“सगळे गणपती, देव एकच असतात, हा नवसाला पावतो तो नवसाला पावतो असे PR करून उगाच प्रसिद्धी मिळवायचे उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यातूनच मंडळाच्या, संस्थांच्या सदस्याकडून मारहाणीचे प्रकार समोर येत आहेत. सध्या भक्तिभावाचा बाजार मांडला जात आहे.”

“आजकाल गणपती सण हा प्रसिद्धी,मोठेपणा मिरवणे झालंय…देव,भक्ती याचा काही संबंध नाही…”