Lalbaugcha raja 2025 video: मुंबईसह राज्यभरातून गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मात्र, या लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वस्तू चोरी झाल्याच्या घटना उघडीस आल्या असून, लालबाग राजाच्या दर्शनानंतर भाविक थेट काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागमधील गणेश भक्तांनी गर्दी केली. या गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी सोन्याचे मौल्यवान दागिने, मोबाइल चोरल्याच्या घटना घडल्या आहेत. काळाचौकी पोलीस ठाण्यात दागिने, मोबाइल चोरीच्या तक्रारी केल्या आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही पुढच्या वर्षी लालबागच्या गर्दीत जाण्याआधी शंभर वेळा विचार कराल.

मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत दाखल होतात. या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. लालबागच्या राजाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी जमलेल्या गर्दीतील अनेक मोबाईल, सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र लंपास केले. या चोरीची फिर्याद देण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात रांग लागली आहे. मोबाईल हरवल्याची तक्रार आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात पोलीस व्यस्त आहेत. तक्रारीसाठीही भाविकांना तासंतास रांगेत उभं राहावं लागत आहे.

पाहा व्हिडीओ

‘व्हीआयपी’ दर्शनावरून लालबागचा राजा मंडळ अडचणीत

‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी सामान्य नागरिक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) असलेल्या वेगवेगळ्या रांगांमुळे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ अडचणीत आले आहे. दर्शन व्यवस्थेतील या भेदभावामुळे मानवाधिकार आयोगाने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला नोटीस बजावली असून याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहेत. तसेच, याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ॲड आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी दर्शन व्यवस्थेबाबत आयोगाकडे तक्रार केल्याच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आली आहे.

दरवर्षी विविध कारणांमुळे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ चर्चेत येते. तसेच, देशभरातून लाखो भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे गणेशोत्सवात लालबागमध्ये कायम प्रचंड गर्दी असते. भाविकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागते. मंडळातर्फे अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि अन्य सामान्य गणेशभक्तांसाठी स्वतंत्र रांगा असतात. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या रांगेतून अनेकांना काही मिनिटांतच लालबागच्या राजाचे दर्शन मिळते. त्यामुळे अन्य भाविकांचा अपमान होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. लालबागच्या राजाच्या दर्शन व्यवस्थेवरून ॲड आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.