सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री धर्मपाल सिंह यांच्या एका कृतीमुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. कारण या मंत्र्याला रेल्वे पकडायची होती म्हणून त्यांनी आपली कार थेट प्लॅटफॉर्मवर नेली. शिवाय मंत्र्याची कार कॅमेऱ्यात कैद झाले असून कारचे फोटो आणि व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
चारबाग रेल्वे स्थानकावरील व्हिडीओ व्हायरल –
धर्मपाल सिंह यांना लखनौच्या चारबाग रेल्वे स्थानकावरून रेल्वे पकडायची होती, पण त्यांना रेल्वे स्थानकात यायला उशिर झाला. त्याचवेळी हावडा-अमृतसर पंजाब मेल प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर आली होती. रेल्वे सुटण्याच्या भीतीने मंत्री महोदय आपली कार थेट फलाटावर घेऊन गेले. या सर्व घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर या प्रकरणावरुन विरोधक मंत्र्यावर टीका करत आहेत.
धर्मपाल यांचा व्हिडीओ व्हायरल होताच, अखिलेश यादव यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, “बरं झालं ते बुलडोझर घेऊन स्टेशनवर गेले नाहीत.” तर एका नेटकऱ्याने लिहिलं, “जेव्हा विक्रम चंद्रावर उतरू शकतो, तर यूपीच्या मंत्र्यांची गाडी थेट प्लॅटफॉर्मवर येऊ शकत नाही का?” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “धन्यवाद. गाडीने एकाही प्रवाशाला धडक दिली नाही, धडक दिली असती तरी कोणी काय केले असते,सर्व प्रवाशांनी मंत्र्यांचा श्रीफळ व शाल देवून सत्कार करावा.” तर काही नेटकऱ्यांनी मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या जप्त करण्याची मागणी केली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रेल्वे पकडण्यासाठी अपंगांसाठी बनवलेल्या रॅम्पवर चढत असताना मंत्र्यांची गाडी प्लॅटफॉर्म एकच्या एस्केलेटरवर पोहोचली. यानंतर मंत्री खाली उतरून निघून गेले आणि गाडी तिथेच थांबवण्यात आली. मात्र, अचानक कार फलाटावर आल्याचे पाहून प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याचंही पाहायला मिळत आहे.
