Leap Year 2024 : २९ फेब्रुवारी रोजी जे जन्माला आले आहेत, त्यांना यंदा त्याचा वाढदिवस त्यांच्या जन्मतारखेवर साजरा करता येणार आहे. कारण २०२४ हे वर्ष लीप वर्ष आहे. दर चार वर्षांनंतर फेब्रुवारी महिन्यात २८ दिवसांऐवजी २९ दिवस येतात, त्यामुळे २०२४ वर्षामध्ये ३६५ दिवसांऐवजी ३६६ दिवस असणार आहे.
पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात. परंतु, त्याची वेळ मोजली असता, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी एकूण ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४६ सेकंद लागतात. म्हणजेच सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वी ३६५ दिवसांपेक्षा थोडा अधिक वेळ लावते. आता लागणाऱ्या अधिक वेळेमुळे, आपल्या कालगणनेत चूक होऊ नये, त्याचा परिणाम पिकांसाठीचा हवामान अंदाज, ऋतू यांवर होऊ नये यासाठी आपण हे लीप इयर/ लीप वर्षाचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा : National Science Day 2024 : आज पुन्हा जाऊ शाळेत! विज्ञानाचे ‘हे’ १० प्रश्न सोडवून पाहा
मात्र, आता या लीप वर्षाला घेऊन जगभरात विविध आणि चित्रविचित्र अशा श्रद्धा, अंधश्रद्धा आहेत. यात काही संस्कृतींमध्ये, देशांमध्ये लीप वर्ष शुभ मानलं जातं, तर काही ठिकाणी अशुभ. तसेच तैवानमध्ये वृद्ध पालकांसाठी खास मेजवानी केली जाते. कोणत्या देशात लीप वर्षासंबंधी कोणते समज आहेत, हे लीप वर्षानिमित्त जाणून घेऊ.
१. केवळ लीप वर्षात स्त्रिया करू शकतात प्रपोज
सध्याचे युग हे ‘मॉडर्न’ युग आहे. या काळात स्त्री-पुरुषांमध्ये समानता आहे. मग अगदी स्त्री-पुरुषाने एकत्र काम करणे असू दे किंवा मग आपल्या प्रेमाची कबुली देणे हे असूदे. आजकाल आपल्या मनातील भावना एका गुडघ्यावर बसून आपल्या प्रियकरासमोर व्यक्त करणाऱ्या अनेक तरुणी, स्त्रिया आहेत. मात्र, अशी पद्धत ही जुन्या काळामध्ये मुळीच नव्हती.
मात्र, पाचव्या शतकात आयर्लंडमध्ये या परंपरेची स्त्रिया आपल्या मनातील प्रेमाची भावना चार वर्षातून केवळ एक दिवस व्यक्त करू शकतात ही कल्पना रूढ झाली होती, असे ‘द क्विन्ट’च्या लेखातून समजते. त्यानुसार पाचव्या शतकात संत ब्रिजेटने, एकदा संत पॅट्रिकला विचारले होते की, “स्त्रियांनादेखील प्रपोज करायची, मनातील भावना सांगण्याची परवानगी द्यायला हवी. कारण पुरुष तसे करण्यास खूप संथ आहेत.” यावर उत्तर म्हणून संत पॅट्रिकने सुचवले “महिलांना दर चार वर्षांनी एक दिवस प्रपोज करण्याची परवानगी आहे.”
२. लीप वर्षातील प्रपोज नाकारल्यास होऊ शकते शिक्षा!
स्कॉटलंडच्या राणी मार्गारेटने १२८८ साली एक भन्नाट नियम लागू केला होता. त्यानुसार जर कुठल्याही पुरुषाने लीप वर्षातील प्रपोजला नकार दिला तर त्याला £१ म्हणजेच आजच्या काळातील अंदाजे १०४ रुपये किंवा सिल्कचा गाऊन/ड्रेस दंड म्हणून द्यावे लागेल.
स्कॉटलंडसह इतर देशातदेखील लीप वर्षातील प्रपोज नाकारल्यास शिक्षा आहे.
डेन्मार्कमध्ये अविवाहित राहण्याचा निर्णय घेणाऱ्या पुरुषांनी त्यांनी नकार दिलेल्या महिलेला १२ जोडी हातमोजे दिले पाहिजेत. या हातमोज्यांच्या मदतीने त्या महिलेच्या हातात अंगठी नाही हे लपवण्यासाठी हा नियम होता, तर फिनलँडमध्ये पुरुषाने नकार दिलेल्या महिलेला, स्कर्ट शिवण्यापुरते कापड द्यावे लागते.
३. या देशांमध्ये लीप वर्षाला अशुभ मानले जाते.
ग्रीक परंपरेनुसार, लीप वर्षात खास करून, लीप [२९ फेब्रुवारी] दिवशी लग्न करणे अशुभ मानले जाते. कारण अशा दिवशी केलेल्या लग्नाचा शेवट हा घटस्फोटाने होऊ शकतो असे तेथील लोकांचा समाज आहे, तर स्कॉटलँडमध्ये ज्यांचा जन्म लीप दिवशी होतो त्यांना प्रचंड दुःखद जीवन जगावे लागते, असे म्हटले जाते. तर बऱ्याच ठिकाणी लीप वर्ष हे शेतकऱ्यांसाठी अशुभ वर्ष असल्याचे समजले जाते.
४. लीप वर्षात तैवानमध्ये वृद्ध पालकांच्या दीर्घायुष्यासाठी केली जाते खास मेजवानी
खरंतर तैवानमध्येदेखील लीप वर्षाला अशुभ मानले जाते. अनेकांचा असा विश्वास आहे की, वृद्ध पालकांचा दर चार वर्षांनी मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते, हे लीप वर्ष अशुभ मानण्याचे कारण आहे. त्यामुळे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या विवाहित मुलीने पिग ट्रॉटर नूडल्स घेऊन घरी परतले पाहिजे, असे म्हटले जाते. या नूडल पदार्थामुळे वृद्ध पालकांना चांगले आरोग्य आणि चांगले नशीब देतो, असे तिथे राहणारी लोकं मानतात.
५. लीप वर्षानिमित्त प्यायले जाते खास पेय
२९ फेब्रुवारी हा लीप वर्षातील खास दिवस असून, या दिवसानिमित्त तयार केलेले खास रंगीत कॉकटेल पिण्यास इंग्लंडमधील लोक महत्त्व देतात. १९२८ साली लंडनमधील ‘द सॅवॉय’ येथील हॅरी क्रॅडॉक नावाच्या एका बारटेंडरने या कॉकटेलचा शोध लावला होता. हे मार्टिनी नावाच्या पेयाचा रंगीत चुलत भाऊ आहे असे मानले जाते. ग्रँड मार्नियर, गोड व्हरमाउथ, जिन आणि लिंबाचा रस एकत्र करून तयार केलेले हे एक कडू गोड कॉकटेल आहे, जे या विचित्र दिवसासाठी अगदीच योग्य आहे. अशी सर्व माहिती ‘द क्विन्ट’च्या एका लेखातून समजते.