Lioness Attack On Kid Video Viral : वन्य प्राण्यांविषयी लोकांना नेहमीच आकर्षण असतं. प्राणी कसं जगतात, काय खातात याविषयी जाणून घेण्याचं कुतूहल त्यांना असतं. त्यात काही प्राण्यांविषयी एक वेगळी भीती मनात असते; पण त्यांना प्रत्यक्षात पाहण्याचा अनुभवही घ्यायचा असतो. त्यामुळे लोक जंगल सफारीसाठी किंवा प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. या ठिकाणचे प्राण्यांचे हल्ले, शिकारी किंवा आपापसांतल्या लढाया यांचे अनेकविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एका प्राणिसंग्रहालयातील सिंहिणीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक भुकेलेली सिंहीण चिमुकल्याला पाहताच असं काही कृत्य करते की, ते पाहून धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

चीनच्या लिओंगिन प्रांतातील शेनयांग प्राणिसंग्रहालयातील हा व्हिडीओ आहे, ज्यात एक सिंहीण चिमुकल्याला पाहताच इतकी आक्रमक होते की, ते पाहून आपल्याला भीती वाटेल. सिंहिणीची चिमुकल्याला पाहिल्यानंतरची कृती खरंच अंगावर शहारे आणणारी होती.

सिंहीण ताकदीने काचेच्या दिशेने झेपावते अन्…

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका प्राणिसंग्रहालयातील सिंहांच्या काचेच्या गॅलरीसमोर एक लहान मुलगा आरामात बसला आहे. या काचेच्या गॅलरीत सिंह आणि सिंहिणीची जोडी बसलेली आहे. चिमुकला सिंहिणीच्या अगदी तोंडासमोर येऊन उभा राहतो तेव्हा ती त्याच्याकडे पाहत राहते आणि अचानक आक्रमक होत ताकदीने काचेच्या दिशेने झेपावते. मजबूत दात, नखे यांच्या मदतीने ती काचेवर ओरखडे काढते आणि काच तोडण्याचा प्रयत्न करते. जणू ती चिमुकल्याला जबड्यात पकडण्याचा प्रयत्न करतेय; परंतु चिमुकला आणि तिच्यात भलीमोठी मजबूत काच असल्याने ती काहीच करू शकत नाही.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण घटनेदरम्यान तो चिमुकला अजिबात न घाबरता, शांतपणे बसून होता. ना ओरड, ना भीती; ती सिंहिण काय करतेय याबाबत कशाचीच त्याला भीती नव्हती. तो अगदी शांतपणे तेथे बसून होता. यावेळी त्याच्यासमोर उभी असलेली त्याची आई हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद करते. नंतर तिने तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. जो तुफान व्हायरलदेखील झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आईला मुलाची काळजी आहे की नाही? युजरचा सवाल

सिंहिणीच्या आक्रमकतेचा हा व्हिडीओ @pubity या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर हजारो युजर्सनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, मुलापेक्षा त्या काचेवर जास्त विश्वास आहे. दुसऱ्या एकाने विचारले की, आई व्हिडीओ बनवते आहे… तिला मुलाची काळजी आहे की नाही? काही वापरकर्ते असा प्रश्नही उपस्थित करीत आहेत की, सिंहासारख्या धोकादायक प्राण्यासाठी एवढा छोटासा एनक्लोजर योग्य आहे का?