Hyderabad Schools : आजकाल सरकारी शाळांच्या तुलनेत सेमी इंग्लिश किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्याकडे पालकांचा ओढा असतो. मात्र, सध्याच्या काळात मुलांना शिक्षण देणं हे खर्चिक होत चाललं आहे ही वस्तुस्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच इंग्रजी माध्यमातील शाळांची वार्षिक फी मोठ्या प्रमाणात असते. याबाबत अनेकदा चर्चाही होतात. अनेकजण याबाबत आवाजही उठवतात. मात्र, शांळाची फी काही कमी झालेली दिसत नाही.

आता एका व्यक्तीने शिक्षणाच्या वाढत्या फी बाबत आवाज उठवत शिक्षण आता परवडणारे नाही, यालाच खरी महागाई म्हणतात असं म्हणत सोशल मीडियावर एक पोस्ट करुन आपलं म्हणणं मांडलं आहे. हैदराबादमध्ये एलकेजीच्या फीमध्ये अनेक पटींनी वाढ झाली असल्याची एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आणि ही पोस्ट एका दिवसांत १६५,००० पेक्षा जास्त वेळा पाहिली गेली आहे.

हेही वाचा : १२ वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी! नवी मुंबई महानगरपालिकेत ‘इतक्या’ जागांसाठी भरती; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या तपशील

खरं तर मोठमोठ्या शहरातील वाढती महागाई ही सर्वसामान्य लोकांसाठी मोठी समस्या बनली आहे. त्यामध्ये खाद्यपदार्थांपासून ते घरभाड्यापर्यंत आणि मुलांच्या शिक्षणाच्या खर्चापर्यंत सर्वच गोष्टी महागल्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमधून वाढत्या महागाईबाबत भाष्य करण्यात आलं आहे. बालवाडीच्या (LKG) फीमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली आहे.

अविरल भटनागर नावाच्या एका व्यक्तीने एक्सवर (ट्विटर) लिहलं आहे की, “खरी महागाई ही रिअल इस्टेटमध्ये नाही तर शिक्षण क्षेत्रात वाढली आहे. हैदराबादमध्ये एलकेजीची फी २.३ लाख रुपयांवरून ३.७ लाख रुपये झाली आहे”, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, ही फी कोणत्या शाळेची आहे, हे त्या व्यक्तीने सांगितलेले नाही. या व्यक्तीने ही पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर शिक्षणाचा वाढता खर्च, महागाई आणि राहणीमानाचा वाढचा खर्च याविषयी सोशल मीडियावर चर्चा रंगली. ही पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अविरल भटनागर नावाच्या व्यक्तीने पुढे असंही म्हटलं आहे की, “गेल्या ३० वर्षांत भारतातील शाळेची फी तब्बल ९ पट आणि महाविद्यालयाची फी २० पटीने वाढली आहे. त्यामुळे आता शिक्षण हे सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचं दिसत आहे.” दरम्यान, यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देत मत व्यक्त केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर एका युजर्सने टिप्पणी करत असंही म्हटलं की, सध्या सरासरी मध्यमवर्गीय कुटुंबाच्या ७० टक्के पेक्षा जास्त उत्पन्न हे अन्न, आरोग्य, शिक्षण यावर खर्च होत आहे. या टिप्पण्यांमुळे शिक्षणाच्या वाढत्या खर्चाची चिंता व्यक्त केली जात आहे.