सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. काही वेळा अशा काही गोष्टी व्हायरल होतात, ज्या पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे, जो एका अनोख्या रेल्वेस्थानकाचा आहे. हा फोटो आता एक चर्चेचा विषय ठरत आहे. रेल्वेस्थानकाची डिझाइन पाहून अनेकांनी त्याची तुलना सॅनिटरी पॅडशी केली आहे. कारण- ती संपूर्ण डिझाइन अगदी सॅनिटरी पॅडप्रमाणेच आहे.

पण, अनेकांना या इमारतीचा वापर कशासाठी केला जाणार आहे, बांधकामासाठी किती खर्च आला. त्याशिवाय त्याच्या डिझाइनबद्दलही चर्चा रंगतेय. व्हायरल होत असलेला हा फोटो चीनच्या नानजिंग नॉर्थ रेल्वेस्थानकाचा आहे. जिथे काही लोक रेल्वेस्थानकाच्या डिझाइनची तुलना सॅनिटरी पॅडशी करीत आहेत. स्थानिक मीडियानुसार, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रेल्वेस्थानकाची ही रचना आलू बुखारा फुलापासून प्रेरित आहे.

बीबीसीच्या म्हणण्यानुसार, नॉर्थ नानजिंग स्थानकाची रचना plum blossoms या फुलापासून प्रेरित आहे; ज्यासाठी हे शहर ओळखले जाते. मात्र, काही लोक त्याची डिझाइन सॅनिटरी पॅडशी करीत आश्चर्य व्यक्त करतायत. नानजिंग स्थानक पाहिल्यानंतर सोशल मीडियावरही लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

चीन सरकारच्या मालकीचे वृत्तपत्र नानजिंग डेलीनुसार, जिआंग्सू प्रांताच्या सरकारने आणि चीनच्या राज्य रेल्वे समूहाने प्रथम या रेल्वेस्थानकाच्या डिझाइनला हिरवा कंदील दिला होता. या इमारतीमध्ये लाकडी छत, खिडकी यांसह अनेक पारंपरिक चिनी वास्तुशिल्पांचा समावेश असेल.

रेल्वेस्थानकासाठी अंदाजे २० अब्ज चिनी युआन ($२,७६३ दशलक्ष) खर्च येईल आणि एकूण ३७.६ चौरस किलोमीटर (१४ चौरस मैल) क्षेत्रफळ असेल. त्याआधी राजधानी बीजिंगमध्ये असलेल्या सीसीटीव्ही मुख्यालयाच्या इमारतीची छायाचित्रेही व्हायरल झाली होती. कारण- अनेकांनी असे म्हटले होते की, त्याच्या अनोख्या आकारामुळे ही इमारत एका मोठ्या बॉक्सर शॉर्ट्ससारखी दिसत आहे. काही वर्षांपासून बीजिंगला वास्तुविशारदांचे क्रीडांगण, म्हटले जाते कारण- तिथे मोठ्या संख्येने अनोख्या आकाराच्या आधुनिक इमारती निर्माण होत आहेत.