उन्हाळ्यात तुम्ही आवडीने खात असलेल्या आईस्क्रीममध्ये चक्क कीडा आढळल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील लखनऊमधील लुलू मॉलमधील असल्याचे समोर आले आहे. येथील फालुदा नेशन नावाच्या आईस्क्रीम शॉपमधून एका ग्राहकाने खरेदी केलेल्या कुल्फीत कीडा सापडला आहे. यानंतर ग्राहकाने स्वत: एक व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला, ज्यात ग्राहक आईस्क्रीमध्ये कीडा सापडल्याचे सांगताना दिसतोय. पण, लुलू मॉलमधील खाद्यपदार्थांच्या निकृष्ट दर्जाची ही पहिलीच घटना नाही, यापूर्वीही मॉलमधील निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांसंदर्भात अनेक तक्रारी आणि व्हिडीओ व्हायरल झाल्या आहेत. दरम्यान, आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरदेखील युजर्स तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

लखनऊमधील लुलू मॉलमध्ये दररोज हजारो लोक फिरण्यासाठी आणि खरेदीसाठी येतात. याच मॉलमधील व्हायरल व्हिडीओत एक ग्राहक तेथील एका आईस्क्रीम दुकानदाराला कुल्फीत आढळलेला कीडा दाखवत आहे. कीडा दाखवल्यानंतर दुकानदार म्हणतो की, दुसरे आईस्क्रीम बनवून देतो. ज्यावर ग्राहक नकार देतो. यानंतर दुकानदार कुल्फीचे संपूर्ण पैसे परत करतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.

काही युजर्स या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘ही छोटी गोष्ट नाही.’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘या घटनेनंतर विभागाने कारवाई करावी.’ आणखी एका युजरने लिहिले की, कोणताही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी तो तपासून घ्यावा.’ इतर अनेक युजर्सही यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.