Maharashtra Board 10th Results 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे आज इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र बोर्डानं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे, यामुळे आता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन पद्धतीनेच राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करत अकरावी प्रवेशासाठी स्पष्ट आणि सुसंगत नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये संपूर्ण प्रक्रिया गुणवत्ताधिष्ठित, पारदर्शक आणि एकसंध असावी, यासाठी आवश्यक सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे या निर्णयानुसार, संपूर्ण राज्यभरातील महाविद्यालये सरकारने निर्धारित केलेल्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरच प्रवेश प्रक्रिया पार पाडणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार महाविद्यालय निवडण्याची मुभा देण्यात आली असून, चार फेऱ्यांद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. या चार फेऱ्यांनंतर ‘सर्वांसाठी खुला प्रवेश’ (ओपन फॉर ऑल) नावाची विशेष फेरी जाहीर करण्यात येणार असून, उर्वरित रिक्त जागांवर त्या माध्यमातून प्रवेश मिळणार आहे. प्रवेश अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक माहितीपत्रक, गुणपत्रक व प्राधान्यक्रमानुसार निवडलेली महाविद्यालयांची यादी ऑनलाइन प्रणालीत भरावी लागेल.

दहावीचा निकाल वेबसाईट आणि मोबाईलवर कसा पाहायचा?
महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in यासह सर्व अधिकृत वेबसाइटवर दहावीचा निकाल तुम्ही थेट पाहू शकता.
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल एसएमएसद्वारे कसा पहावा
१. तुमच्या मोबाइलमध्ये एसएमएसचं ॲप घ्या.
२. यामध्ये महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १०वी निकाल २०२४ साठी MHSSC सीट क्रमांक टाइप करा.
३. त्यानंतर ५७७६६ वर एसएमएस पाठवा