Viral Video : शुक्रवारी महाराष्ट्रीयन महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते पण काही मराठी कुटुंब परदेशात राहतात. त्यामुळे तेथील मराठमोळ्या स्त्रियांना वडाच्या झाडाची पूजा कशी करावी, हा खूप मोठा प्रश्न पडतो. अशाच एका मराठी महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये न्युझिलंडमध्ये राहणाऱ्या महिलेने तिथे वडाचे झाड मिळाले नाही म्हणून चक्क लॅपटॉवर वडाच्या झाडाचा फोटो लावला आणि पूजा केली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये न्युझिलंडमध्ये राहणारी मराठमोळी महिला तिने वटपौर्णिमा कशी साजरी केली, याविषयी सांगते. ती व्हिडीओत सांगते, “आज म्हटलं लग्न झालेल्या बाईसारखं दिसावं. भांगात कुंकू वैगरे भरून टिकली लावून मंगळसूत्र घालावं आणि साडी नेसावी. कारण आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा म्हणजे मराठी लोकांचा करवाचौथ. तर या दिवसामागची कथा अशी की सत्यवान आणि सावित्री जंगलात हिंडायला बागडायला निघाले. सत्यवानाला पडले माकड चाळे आणि तो वडाच्या झाडावर मरायला चढला आणि पडून मेला आणि शेवटी मग यमराज आला आणि त्याला घेऊन जात होता तेव्हा सावित्री म्हणाली, “नको बाबा घेऊन नको जाऊ माझा गुणाचा नवरा आहे. मला हाच नवरा सात जन्मांसाठी हवा आहे” मग तिने वडाच्या झाडाची पूजा वैगरे केली आणि तिला सात जन्मांसाठी तोच नवरा मिळाला. “
ती पुढे सांगते, “पण मला पडलेला प्रश्न असा की न्युझीलंडमध्ये वडाचं झाड कुठून मिळणार आणि रिस्क तर अजिबातच घ्यायची नाही कारण सात जन्मांसाठी एकच नवरा हवा आहे. मग शेवटी अक्कल लढवली, लॅपटॉवर लावला वडाच्या झाडाचा फोटो आणि केली पूजा. कारण नवरा हा दगडासारखा असतो आणि त्याला कोरून तासून मूर्ती बनवावी लागते आणि एका नवऱ्यावर प्रेम करायला एक जन्मही अपूरा पडतो बाईला तरीसुद्धा बायका म्हणतात आमचं हे आमचं ऐकतच नाही त्यांना वाटेल तेच करतात. मग एक नवरा ट्रेन करायला पूर्ण आयुष्य घालवावं लागतं मग त्याच्यासाठी परत दुसऱ्या नवऱ्यासाठी दुसरं आयुष्य घालवण्यापेक्षा हाच नवरा सातही जन्म मिळू दे”
पाहा व्हायरल व्हिडीओ
shrutika_bhosale_avishkar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप गोड आणि सात जन्मामागील कारण खूप लॉजिकल आहे. अशी हूशार बायको मिळाली अविनाश खूप नशीबवान आहे. तर एका युजरने लिहिलेय, “बाकी सर्व ठीक आहे पण कथा चुकीची सांगितली ताई” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.