आतापर्यंत आपण बहुतेकांना दारू, सिगारेट, तंबाखूचे व्यसन जडल्याचे ऐकले असेल; पण आज आपण जगातील अशा एका व्यक्तीबद्दल माहिती घेणार आहोत की, ज्याला फारच विचित्र असे व्यसन जडले आहे. अमेरिकेतील या व्यक्तीला ट्युना मासा खाण्याचे, त्याच्या डब्याचा वास घेण्याचे आणि त्या डब्यातील माशाचे पाणी पिण्याचे वाईट व्यसन जडले आहे. तो या व्यसनाच्या इतका आहारा गेलाय की, तो आठवड्याला ट्युना माशाचे जवळपास १५ डबे एकटाच संपवतो.
या व्यक्तीला आता ‘ट्युना टायलर’ नावाने ओखळले जाते. लॉरेन्स, कॅन्सस येथे राहणारी ही व्यक्ती माय स्ट्रेंज ॲडिक्शन : स्टील ॲडिक्टेड? नावाच्या कार्यक्रमातील एका एपिसोडमध्ये तो सहभागी झाला होता. यावेळी त्याने ट्युना फिश कॅनचे व्यसन कसे जडले याबद्दल माहिती दिली.
‘द न्यूयॉर्क पोस्ट’मधील एका अहवालानुसार, टायलरचे हे व्यसन आता इतके वाढले आहे की, तो ट्युना माशाच्या डब्यातील पाण्याचा परफ्युम म्हणून वापर करतो. याबाबत टायलरने सांगितले की, त्याला दररोज पूर्ण वेळ, संपूर्ण रात्र, कोणत्याही दिवशी ट्युना माशाचा वास घ्यायला आवडते.
या संदर्भात टायलरची आई उर्सुलाने सांगितले की, त्याला नेहमीच मासे आवडायचे. तो लहान असताना इस्टरच्या वेळी बहुतेक मुलांना चॉकलेट आणि तत्सम पदार्थ हवे असायचे; पण त्यावेळी आम्ही त्याला चॉकलेटऐवजी त्याला ट्युना आणि सार्डिनचे डबे द्यायचो. कारण- त्याला ते खूप आवडायचे.
“पण, त्याची ही आवड नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढेल, असं मला कधी वाटलं नव्हतं. तो त्या माशांचा वास घेऊन डबा पुन्हा ठेवून द्यायचा. पण, त्याची ही सवय कधी व्यसनात रूपांतरीत झाली ते कळलंच नाही”, असेही टायलरच्या आईने सांगितले.
यूट्युबवर शेअर केलेल्या टीव्ही शोच्या व्हिडीओ क्लिपमध्ये टायलर एका कॉफी शॉपमध्ये बसलेला दिसत आहे. तो खिशातून ट्युनाचा एक छोटा कॅन आणि एक कॅन ओपनर काढतो. आजूबाजूला एक नजर टाकून टायलर काळजीपूर्वक तो कॅन उघडतो आणि त्याचा खूप वेळ वास घेतो.
तो हा विचित्र वास घेत असतानाच, एक महिला त्याच्याकडे कॉफीचा गरम कप घेऊन आली. यावेळी त्याने कॉफी पिण्याऐवजी पुन्हा एकदा ट्युनाचा वास घेतला. त्याच्या अशा वागण्याने आजूबाजूच्या उत्सुक कॉफी शॉप क्रूचे लक्ष वेधले गेले.
याबाबत तो म्हणतो की, ते मला टयुना टायलर म्हणतात. कारण- मला ट्युना माशाचे वास घेण्याचे व्यसन आहे. जेव्हा लोक मला सार्वजनिक ठिकाणी ट्युनाचा वास घेताना पाहतात, तेव्हा त्यांना नक्कीच वाटत असे की, हे काहीतरी वेगळं आहे. हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. पण लोकांना हे विचित्र वाटत असले तरी मला ते पूर्णपणे ठीक वाटते.