Begging inside Metro Video Viral: बंगळुरू शहर हे स्टार्टअपचं शहर मानलं जातं. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे इथं कार्यालयं आहेत. आयटी इंडस्ट्री आहे. अशा बंगळुरूमधील मेट्रोमध्ये एका व्यक्तीनं भीक मागण्याचं स्टार्टअप सुरू केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बंगळुरूच्या नम्मा मेट्रोमध्ये मंत्री स्क्वेअर सॅम्पिंग रोड आणि श्रीरामपुरा स्थानकादरम्यान एका व्यक्तीने भीक मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बीएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांनी व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. सदर घटना कधी घडली याबाबत निश्चित सांगता येत नाही. या व्यक्तीने तिकीट काढून ग्रीन लाईन स्थानकातून प्रवेश केल्याचे दिसून आले आहे.

कधी घडली घटना?

व्हायरल व्हिडीओमधील दाव्यानुसार, सोमवारी सकाळी ११.०४ वाजता ही घटना घडल्याचं सांगितलं जातं. तिकीट काढून आल्यानंतर सदर व्यक्तीने ट्रेनमध्ये भीक मागितली. मात्र जेव्हा सुरक्षा कर्मचारी नियमित तपासणीसाठी आले तेव्हा त्याने भीक मागणे बंद केले.

व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे हा व्यक्ती प्रत्येक प्रवाशाकडे जाऊन पैसे मागत आहे. अनेक लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. तर काही जण आश्चर्यकारक नजरेने त्याकडे पाहत आहेत.

मेट्रो प्राधिकरणाने म्हटल्यानुसार, मेट्रो स्थानक आणि ट्रेनमध्ये भीक मागण्यास सक्त मनाई आहे. अशा कृत्यावर आमचे सुरक्षा रक्षक बारीक लक्ष ठेवून असतात. आमचे कर्मचारी अधूनमधून ट्रेनमधून प्रवास करत असतात. ट्रेनमध्ये कुणी सामान विकत असेल, भीक मागत असेल, मोठ्यानं गाणी वाजवत असेल किंवा वृद्ध आणि अपंगांसाठी राखीव असलेल्या जागांवर बसलेले असेल तर असे कृत्य करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येते.