भारतीय लोक बऱ्याचदा शिक्षण किंवा नोकरीच्या निमीत्ताने परदेशात जातात, तेव्हा त्यांना तेथील महागाई पाहून धक्का बसतो. आपल्याकडे भाजीपाला खरेदी करताना कोथिंबीर, मिरच्या अशा कधीकधी इतर भाजीबरोबर मोफत मिळणाऱ्या वस्तूंसाठी देखील इथे भरपूर पैसे मोजावे लागतात. मात्र सध्या सोशल मीडियावर जर्मनीहून भारतात परतलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
व्यक्तीची बहीण त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहे. भारतात दैनंदिन वापराच्या वस्तू जर्मनीच्या तुलनेत कितीतरी स्वस्त आहेत, हे पाहून त्या व्यक्तीला बसलेला धक्का व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला ‘अॅव्हरेज जर्मनी रिटर्न’ असं कॅप्शन देण्यात आलेले आहे. “POV : जेव्हा भारतातील प्रत्येक वस्तू, ज्या देशातून तुम्ही परतला आहात, त्या देशापेक्षा स्वस्त असते. हा भाऊ नुकताच जर्मनीहून परतला आहे,” व्हिडीओमध्ये असा मजकूर देण्यात आलेला आहे.
व्हिडीओमध्ये काय आहे?
या व्हिडीओच्या सुरूवातीलाच एक व्यक्ती त्याच्या बहिणीबरोबर दुकानात चालताना दिसत आहे. त्याला पहिला धक्का तेव्हा बसतो जेव्हा तो भारतात २० रुपये किंमत असलेल्या Tic Tac चा एक बॉक्स हातात घेतो. त्यावर तो म्हणतो की, “किती स्वस्त!” आणि लगेच पुढे सांगतो की, जर्मनीमध्ये याच कँडीसाठी त्याला २०० रुपये द्यावे लागतात.
त्यानंतर त्याने २.२५ लिटरची कोका-कोलाची बाटली उचलतो आणि त्याची किंमत फक्त ९५ रुपये पाहून त्याला आश्चर्य वाटतं. तो पुढे म्हणतो की, “जर्मनीमध्ये आम्हाला दोन-लिटरच्या बाटलीसाठी २५० रुपये द्यावे लागत होते.” त्यानंतर तो एक फ्रूटीची बॉटल पाहतो ज्याची किंमत १०० रुपये आहे आणि तो म्हणतो की हे तर जर्मनीत मिळतच नाही.
सामान खरेदी झाल्यावर तो जेव्हा बिल देण्यासाठी गेला तेव्हा एकूण बिल पाहून त्याला पुन्हा धक्का बसला. ते बिल फक्त १२.५ युरो (सुमारे १,२७३ रुपये) इतके होते आणि जर्मनीच्या तुलनेत भारतात किराणा सामान किती स्वस्त आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
या व्हिडीओच्या खाली कमेंटमध्ये अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी ही बाब आपल्यासाठी रिलेटेबल असल्याचे म्हटले आहे तर काहींनी क्रयशक्ती समानता (purchasing power parity) हा मुद्दा उपस्थित केला आहे.
एका सोशल मीडिया यूजरने म्हटले आहे की मला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. “मी पूर्णपणे सहमत आहे…. इथे कोरियामध्ये आम्हाला भारतीय किराणामालासाठी ३ पट जास्त रक्कम द्यावी लागते.” तर दुसऱ्या व्यक्तीने “प्रत्येकाने क्रयशक्ती समानता ही संकल्पना वाचायलाच हवी,” असे सुचवले आहे.
