सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडिओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. काही व्हिडिओतून बोध, तर व्हिडिओ पाहताना अंगावर काटा येतो. असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहताना एखाद्या चित्रपटातील दृश्य आहे, असं वाटेल. एका कुत्र्याचे जीव वाचवण्यासाठी एका व्यक्तीने आपला जीव धोक्यात टाकल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळावर उतरून कुत्र्याचा जीव वाचवल्याचे पाहायला मिळत आहे. एक कुत्रा ट्रेनच्या रुळावर उभा असल्याचे दिसत आहे. कुत्र्याच्या गळ्यातील बेल्टची दोरी ट्रेनच्या रुळांमध्येच अडकली आहे. तेवढ्यात ट्रेन जवळ येत असल्याचा आवाज येतो. यानंतर एक व्यक्ती देवदूतासारखी वेगाने धावत येते आणि कुत्र्याची रुळामध्ये अडकलेली दोरी काढण्याचा प्रयत्न करते. हे दृश्य पाहताना अनेकांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकेल. अवघ्या काही क्षणांवर ट्रेन असताना ती व्यक्ती कुत्रा सोडवण्यात यशस्वी होते. कुत्रा आणि त्या व्यक्तीचे दोघांचेही जीव वाचतात. व्यक्तीने जीव धोक्यात टाकून कुत्र्याचा जीव वाचवल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी लिहिले आहे की, “कुत्र्याला वाचवताना या व्यक्तीने आपला जीव पणाला लावला. मानवतेचा खरा हिरो”. एका युजर्सने लिहिले आहे की, “आजच्या काळात माणसं माणसांच्या कामी येत नाहीत. मुक्या प्राण्याचा जीव वाचवल्याने त्या व्यक्तीच्या साहसाला सलाम”.