Marathi vs Hindi Japanese Man Speaks Fluent Marathi: महाराष्ट्रात मराठी भाषेवरील वाद सतत वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, हल्ली ही प्रकरणं वाढत आहेत.गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक वाद पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यातील १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यतील राजकीय क्षेत्रातून विरोध केला जात आहे. मात्र, राज्यभरातील लोकांनी संताप व्यक्त केल्यानंतर ही सक्ती मागे घेण्यात आली. अशातच राज्यात हिंदी सक्तीचा वाद सुरू असताना एका जपानी तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. एक जपानी तरुण अस्खलित मराठी बोलताना दिसतोय. याचं मराठी ऐकून तुम्हीही तोंडात बोटं घालाल.

एकीकडे दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात आलेले लोक मराठी बोलायला नाकं मुरडतात तिथेच हा जपानी तरुण अगदी सहज मराठी बोलतोय. या जपानी तरुणाचं मराठी ऐकून तुम्हीही खूश व्हाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका टॅक्सीमध्ये हा जपानी तरुण बसला आहे, यावेळी तो टॅक्सी चालकाला म्हणतो, मराठीत बोलुयात. यावर मराठी टॅक्सीचालकही हो म्हणतो आणि दोघांच्या संभाषणाला सुरुवात होते. “चला, मराठीमध्ये बोलूया” असं म्हणत त्यानं आपल्या व्लॉगची सुरुवात केली. पुढे त्यानं टॅक्सीवाल्याला विचारलं, मुंबईत फिरण्यासाठी सर्वात चांगली जागा कुठली आहे? यावर ड्रायव्हरनं “अलिबाग किंवा रायगडला जा” असं सांगितलं. कदाचीत फिरण्यासाठी विचारलं म्हणून ड्रायव्हरनं ही पर्यटन स्थळं सुचवली असावी. पुढे त्या जपानी तरुणानं ड्रायव्हरचं कौतुक करत “तुम्ही खूप छान गाडी चालवता” असं म्हटलं. यावर ड्रायव्हरनं त्याला धन्यवाद देत “गेली २० वर्षं गाडी चालवत आहे” अशी माहिती दिली. पुढे तो विचारतो, “मुंबईमध्ये गाडी चालवणं फार कठीण असेल ना?” यावर ड्रायव्हर उत्तर देतो, “बिलकूल नाही! माझ्यासाठी गाडी चालवणं हा डाव्या हाताचा खेळ आहे.”

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ shige_japaniguruji नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत जपानी तरुणाचं कौतुक करत आहेत. एकानं म्हंटलंय, “मनसे अध्यक्ष जपान शाखा, असा असतो राज ठाकरेंचा धाक, तर आणखी एकानं, “असच मराठी बोलत जा छान बोलतोस मराठी” अशी प्रतिक्रिया दिली आहे.