महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीतील घटक पक्ष असे दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. त्यातच आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानुसार मनसेने भोंग्याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. याच कारणामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली असून राज यांनाही नोटीस पाठवण्यात आलीय. एकीकडे मनसेकडून राज्य सरकारवर टीका केली जात असतानाच दुसरीकडे शिवसेना तसेच राज्य सरकारची बाजू शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे वेळोवेळी प्रसारमाध्यमांशी चर्चा करुन मांडत आहेत. मात्र या आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्यांदरम्यान सध्या संजय राऊतांचं एक वक्तव्य चर्चेत असून मनसेचे एकमेव आमदार असणाऱ्या राजू पाटील यांनीही यावरुन राऊतांवर निशाणा साधलाय.

झालं असं की मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भोंगा प्रकरणाबद्दल भाष्य करताना राज्य सरकार सक्षम असल्याचं सांगत होते. यावेळेस त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा उल्लेख केला. मात्र पुढे मुख्यमंत्र्यांचं नाव घेताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंऐवजी चुकून थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव घेतलं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हाच व्हायरल व्हिडीओ राजू पाटील यांनी ट्विटरवरुन शेअर करताना संजय राऊतांना टोला लगावलाय. ‘सत्य वाचा…’ या कॅफ्शनसहीत पाटील यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. तसेय या ट्विटमध्ये त्यांनी ‘खरे सुपारीबाज’ आणि ‘संजय उगाच’ हे दोन हॅशटॅग वापरले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या मनसे आणि भाजपाच्या समर्थकांकडून संजय राऊतांचा हा व्हिडीओ व्हायरल केला जातोय.