अनेकदा भुताखेतांच्या गोष्टींमुळे काही ठिकाणे ओस पडतात. या ठिकाणांच्या कहाण्या मग सगळीकडेच ऐकायला मिळतात. अशा भागांमध्ये मग भितीमुळे कोणी फिरकतही नाही. मात्र अमेरिकेत एक असे ठिकाण आहे, जे भुताखेतांच्या वास्तव्याची कोणतीही चर्चा नसतानाही ओस पडले आहे. या भागात संपूर्णत: शुकशुकाट आहे.

अमेरिकेतील ओक्लाहोमामधील पिशेर शहरात १० वर्षांपूर्वी बरीच वर्दळ होती. २० व्या शतकात तर हे शहर खाणकाम उद्योगासाठी प्रसिद्ध होते. या भागात झिंक आणि शिसाचे प्रमाण अतिशय जास्त होते. त्यामुळे इथे औद्योगिकरणाची सुरुवात अगदी जोरात झाली. १९१३ मध्ये जेव्हा ओक्लाहोमाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला, त्यावेळी पिशेर औद्योगिक विभागाला प्राधान्य देण्यात आले होते. मात्र ज्या झिंक आणि शिसामुळे या भागाची भरभराट झाली, त्याच झिंक आणि शिसामुळे आज या भागात शुकशुकाट परसला आहे. गेल्या ७ वर्षांपासून पिशेरमध्ये कोणीच राहात नाही.

कधीकाळी पिशेरमध्ये १० हजार लोक राहायचे. मात्र २००९ पासून हे ठिकाण निर्मनुष्य झाले आहे. मोठ्या प्रमाणात शिसे आढळत असल्याने पिशेरमध्ये राहणाऱ्या लोकांचे आयुष्य समृद्ध झाले होते. मात्र १९९६ पर्यंत याच शिसामुळे इथल्या ३४% लोकांना विषबाधा झाली. त्यामुळेच २००९ मध्ये हे संपूर्ण शहर रिकामी करण्यात आले. कधीकाळी ज्या औद्योगिक प्रगतीमुळे पिशेर अमेरिकेत ओळखले जात होते, त्याच औद्योगिक प्रगतीने शहराच्या जीवनमानाची मात्र अधोगती केली.

औद्योगिक प्रगतीमुळे या भागातील हवा आणि पाणी विषारी बनली आहे. शिसे आणि झिंकसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात विषारी कचरा जमा झाला आहे. पिशेर शहराचे सौंदर्य अद्याप टिकून आहे. मात्र या सौंदर्याला विषारी वातावरणाची किनार आहे.