Seagull And Swan Video Viral : आईला आपल्या जीवापेक्षा मुलांच्या जीवाची अधिक काळजी असते. ती प्रत्येक संकटात मुलाची साथ देते, वेळ आली, तर स्वत:चा जीव धोक्यात घालते; पण आपल्या मुलांना काही होऊ देत नाही. पण आईच्या प्रेमाशी संबंधित ही गोष्ट केवळ मानवांनाच नाही, तर प्राणी, पक्ष्यांमध्येही पाहायला मिळते. याच संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात हंस आई तिच्या पिल्लांची शिकार करण्यासाठी आलेल्या सीगल पक्ष्याला असा काही धडा शिकवते की, तुम्ही पाहतच राहाल. हंस हा तसा शांत पक्षी आहे; पण जेव्हा पिल्लांच्या संरक्षणाची वेळ येते तेव्हा तो इतका आक्रमक होऊ शकतो की याची कोणीही अपेक्षाच केली नसेल.
सीगल हा असा पक्षी आहे, जो संधी मिळाल्यास मासे, कीटक किंवा लहान प्राणी यांची शिकार करू शकतो. तो इतका शक्तिशाली आणि वेगवान असतो की, शिकाऱ्याला काही समजण्याच्या आत तो त्याचा खेळ खल्लास करतो. यामुळे प्रत्येक वेळी त्याला त्याची शिकार मिळते.
बऱ्याचदा या पक्ष्याला शिकार मिळत नाही आणि तोच शिकार होतो. या व्हिडीओतच पाहा ना, जिथे एक सीगल पक्षी हंसाच्या पिल्लाला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करीत होता; पण त्याच्याबरोबर असे काही घडले की, तोच शिकार बनला.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तळ्यात हंस आणि तिची पिल्ले आरामात पोहण्याचा आनंद घेतायत. याचदरम्यान आकाशातून एक सीगल पक्षा त्यांच्या जवळ येतो आणि घिरट्या घालू लागतो. नंतर संधी साधून तो हंसाच्या पिल्लांवर हल्ल्याचा प्रयत्न करतो. पण, जवळच त्या पिल्लांची आई असते, ती सीगल पिल्लांपर्यंत पोहोचण्याआधीच चोचीने त्याच्यावर हल्ला चढवते. थेट त्याला पाण्यात ओढत आणते. त्यानंतर सातत्याने चोचीने त्याच्यावर हल्ला करत राहते, ज्यामुळे सीगल घाबरतो आणि शेवटी जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जातो. अशा प्रकारे ही हंस आई आपल्या पिल्लांचे सीगल पक्ष्यापासून संरक्षण करते.
हा विलक्षण व्हिडीओ एक्सवर @gunsnrosesgirl3 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. अनेकांना त्यातून आईची माया दिसून आली, एका युजरने लिहिले की, आईशी भिडण्याची हिंमत कोणी करत नाही, मग हा सीगल कसा हिंमत करू शकतो. दुसऱ्याने लिहिले की, जो कोणी आईशी नडेल, तो नक्कीच धुळीत मिळेल. तिसऱ्याने लिहिले की, सीगल हंसाशी नाही, तर एका आईशी लढण्याचा प्रयत्न करत होता.